

ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे. पाणी दूषित होऊन ते आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. परिणामी नदीत अनेक माशांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळपासून पात्रात मृत मासे तरंगताना दिसून येत आहेत. तर नदीत मळीमिश्रित पाणी सोडल्याने पाणी दूषित झाल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. नदीकाठावर सर्वत्र मृत माशामुळे दुर्गंधी पसरली आहे. अनेक गावांना नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
चिकुर्डे वारणा नदी परिसरात साखर कारखाने तसेच इतर कारखाने आहेत. नेमके कोणत्या कारखान्याचे दूषित पाणी नदीमध्ये सोडले जाते हे अद्याप समजू शकलेले नाही. या दूषित पाण्यामुळे हजारो मृत माशांचा खच नदी काठावर दिसून येत आहे. चिकुर्डेसह ऐतवडे खुर्द, देवर्डे, कुरळप, ऐतवडे बुद्रुकसह परिसरातील गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून पुरवठा होतो. दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्षातून दोनवेळा वारणा नदीत मळीमिश्रित पाणी सोडले जाते. यावर कोणत्याच अधिकार्यांचे लक्ष व नियंत्रण नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.