ऐतवडे बुद्रुक, पुढारी वृत्तसेवा :पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. चिकुर्डे (ता. वाळवा) येथील वारणा नदीवरील बंधार्यामधील दरवाजांमध्ये वाहून आलेला पालापाचोळा, कचरा अडकला आहे. त्यामुळे बंधार्याला धोका निर्माण झाला आहे.संबंधित विभागाचे ऐन पावसाळ्यातच याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.
चांदोली पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा बंधार्यात अडकला आहे. त्यामुळे बंधार्याचे दरवाजे तुंबले आहेत. पाण्याची फूग वाढल्याने ते पाणी काठावरील शेतात शिरत आहे. त्यामुळे जमिनी खचण्याची भीती आहे. पावसाचे प्रमाण वाढत असल्याने पाण्याचा दाब वाढतो आहे. महापुरावेळी बंधार्यामध्ये कचरा अडकल्याने पाणी पात्राबाहेर जाऊन जमिनी, रस्ते खचले होते. आता, संबंधित विभागाने कचरा काढून बंधारा वाहता करण्याची मागणी होत आहे.