

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, सोमवार, दि. 15 रोजी सांगली दौऱ्यावर येत आहेत. येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
महापालिका निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशा पार्श्वभूमीवर सांगलीत हा सोहळा होत आहे. यानिमित्ताने भाजपतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार, असे दिसते.
येथील प्रभाग क्रमांक 9 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिकेच्यावतीने हा पुतळा उभारला आहे. पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांना या सोहळ्याचे निमंत्रण आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताचे फलक शहरभर लागले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे नेते शेखर इनामदार, जयश्री पाटील, भाजप नेत्या नीता केळकर, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह भाजपचे पथक मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री फडणवीस सांगलीत येत आहेत, त्यामुळे नेते व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.