

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे शेतकऱ्यांच्या परस्पर झालेल्या अवैध मुरूम उत्खननप्रकरणी महसूल विभागाने तातडीने कारवाईची पावले उचलावीत, पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण कामाच्या ठेकेदार कंपनीने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे त्या शेतकऱ्यांना कंपनीकडून तातडीने भरपाई मिळवून द्यावी, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत.
या अवैध मुरूम उत्खननप्रकरणी आ. जयंत पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी महसूलमंत्री बावनकुळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत जिल्हा व तालुका महसूल प्रशासनाला याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. एवढे मुरूम उत्खनन होईपर्यंत महसूल प्रशासन काय करीत होते? असा सवालही मंत्री बावनकुळे यांनी केला.
पुणे - बेंगलोर महामार्गाच्या सुरू असलेल्या सहापदरी कामासाठी संबंधित ठेकेदार कंपनीने येडेनिपाणी (ता. वाळवा) गावच्या हद्दीत बेकायदेशीर मुरूम उत्खनन केले आहे. याप्रकरणी शेतकरी रंगुबाई अशोक खंडागळे (रा. मालेवाडी) यांनी महसूल विभागाकडे तक्रार करूनही महसूल विभागाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांच्याकडे दाद मागितली होती. आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. तहसीलदारांनाही याबाबत कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र महसूल विभागाकडून अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने आ. जयंत पाटील यांनी महसूलमंत्र्यांपुढे हा विषय मांडला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना संबंधित ठेकेदाराकडून त्या शेतकऱ्याला भरपाई मिळवून देण्याचे तसेच नुकसान झालेली जमीन पूर्ववत करून देण्याचे आदेश दिले आहेत. एवढे उत्खनन होईपर्यंत महसूल प्रशासन गप्प का होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला, तर आ. जयंत पाटील यांनी, परवानगीपेक्षा जादा उत्खनन केल्याप्रकरणी ठेकेदारावर काय कारवाई केली, महसूल प्रशासन ठेकेदाराचे एवढे लाड का करीत आहे, असे प्रश्न उपस्थित केले. यावर तहसीलदार यांनी संबंधित ठेकेदाराला जादा उत्खननाबाबत दंड केल्याचे सांगितले. आता महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई होणार का, ते पाहावे लागेल.