

करमाळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गतिमान, पारदर्शी व लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य दिले असून लोकांना न्याय देण्याचे सरकारचे धोरण आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करमाळ्यात सांगितले.
येथील दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात मंत्री बावनकुळे बोलत होते. महसूलची कामे तहसीलदार ते तलाठी या स्तरावर मार्गी लागण्याऐवजी लोक मंत्र्यापर्यंत निवेदन घेऊन येतात हे चित्र बदलणे गरजेचे आहे. राज्य सरकार देवस्थान जमीन कायदा लवकरच आणणार असून देवस्थानच्या जमिनी वहिवाट करणाऱ्यांना व कुळांना यांचा लाभ होणार आहे. गायरान जमिनीत अतिक्रमण करून घरे बांधून राहणाऱ्यांना मालकी हक्काने जमीन देण्याचा निर्णय नुकताच झाल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाच्या अद्ययावत नूतन इमारतीचे उद्घाटन महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषदेच्या भाजप गटनेत्या रश्मी बागल, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, प्रांतअधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सहनिबंधक अरविंद कोकाटे, उपनगराध्यक्ष अतुल फंड आदी उपस्थित होते.