

मिरज : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत. ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे. त्यांच्यासाठी आमच्या शिवसेनेची दारे कायम उघडी आहेत, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे नेते, खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी रात्री मिरजेत पत्रकारांशी बोलताना केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरजेतील कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येऊ शकले नाहीत. मात्र श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. मिरजेतील शिवकालीन मर्दानी खेळाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये अनेक योजना राबवल्या. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेकजण शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना जो भक्कम पाठिंबा मिळतो, त्यामुळे अनेकजण आमच्यासोबत येत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत. ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांच्यासाठी आमच्या शिवसेनेची दारे उघडी आहेत. चंद्रहार पाटील ताकदीचेच पैलवान आहेत. त्यांना जी ताकद लागेल, ती आम्ही निश्चित देऊ. आमच्या शिवसेनेमध्ये काम करणार्याला वाव मिळतो. पूर्वीच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्ते थेट नेत्याला भेटू शकत नव्हते. मात्र आमचे नेते प्रत्येक कार्यकर्त्याला वेळ देतात, भेटतात.
खासदार शिंदे म्हणाले, सध्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यामुळे मुले आणि तरुण पिढी ही त्यामध्ये वेळ घालवित आहे. त्यांनी ते तसे न करता शिवकालीन खेळांकडे लक्ष द्यायला हवे. प्रत्येक शाळेमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची सुरुवात व्हायला पाहिजे. प्रत्येक शहरामध्ये मर्दानी खेळाचे कार्यालय सुरू व्हावे. आगामी काळामध्ये शिवकालीन मर्दानी खेळाची एक चळवळच उभी राहण्याची गरज आहे.