Chandrakant Patil : विकासासाठी घरपट्टीवाढ आवश्यक

पालकमंत्री चंद्रकांत पाटील; वसंतदादा बँकेला नियमानुसारच मदत
Chandrakant Patil |
Chandrakant Patil Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : विकास कामांसाठी कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टीवाढ झाली पाहिजे. ती वाढवली नाही तर शहराचा विकास होणार नाही, त्यामुळे या निर्णयाला सर्वांचे सहकार्य हवे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच वसंतदादा बँकेला कायद्याच्या चौकटीतच मदत करण्यात आली असून, याविरोधात कोणी न्यायालयात गेल्यास आम्ही केस जिंकू, असा दावाही त्यांनी केला.

ते म्हणाले की, सध्याचे ६०० कोटी रुपयांचे पूर नियंत्रणाचे काम हे महापुराच्या काळात नाल्यांमधून शहरात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनाबाबतचे आहे. पुराचे पाणी वळविण्याबाबत स्वतंत्र १० हजार कोटी रुपयांचा वेगळा प्रस्ताव आहे. त्यामुळे विषय पूर्ण समजून घेऊन प्रस्तावीत कामात सूचना करा, पण विचार न करता विरोध करू नका.

महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढल्याशिवाय शासनाकडूनही पैसे मिळणार नाहीत. सध्याच्या प्रस्तावीत घरपट्टी वाढीमुळे ७० टक्के लोकांना अडचण नाही, तर केवळ ३० टक्के लोकांच्या अडचणी आहेत. त्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मार्ग काढला जाईल. शैक्षणिक व सामाजिक संस्थांना लावल्या जाणाऱ्या घरपट्टीबाबत विचार करता येईल. व्यापाऱ्यांच्या घरपट्टीचे गणित दुरुस्त करता येईल; मात्र घरपट्टी वाढवायचीच नाही अशा धोरणाने विकास होणार नाही. वसंतदादा शेतकरी सहकारी बँक घोटाळ्याची २०१४ पासून चौकशी सुरू आहे. हे आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरण असून यातील सुमारे ८५ टक्के ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत. ही चौकशी किती दिवस सुरू ठेवायची, असा प्रश्न उपस्थित करत आम्ही या बँकेला कायद्याच्या चौकटीतच मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

विशाल पाटील यांनी मला तोंड उघडायला लावू नये

पोलिस ठाणी विकली जात आहेत, असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. याबाबत ते म्हणाले की, विशाल पाटील यांनी कारखाना आणि सहकारी संस्था कशा मोडीत काढल्या, हे प्रथम सांगावे. तरीही त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज कशी देते, हा प्रश्न आहे. त्यांनी मला तोंड उघडायला लावू नये. त्यांनी समोरासमोर पत्रकार परिषद घेऊन बोलण्याचे आव्हान द्यावे, मी ते कधीही स्वीकारण्यास तयार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news