

मिरज : आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर सांगितले आणि जयंत पाटील यांना भाजपमध्ये घेण्याचे ठरवले, तर त्यासाठी मीच पहिल्यांदा जयंत पाटील यांच्याकडे जाईन, असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत केले.
जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मिरजेत कदम यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्याकडे देवेंद्र फडणवीस हेच एकमेव नेते आहेत, त्यांचेच आम्ही ऐकतो. भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना घेण्याचा निर्णय जर फडणवीस यांनी घेतला, तर जयंत पाटलांच्याकडे मीच पहिल्यांदा जाईन आणि तुम्ही भाजपमध्ये आले पाहिजे, असे जयंत पाटलांना मीच सांगेन.
पण देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतल्याशिवाय आम्ही असे काहीही करत नाही. मुख्यमंत्री फडणवीस असा कोणताही निर्णय करतील, अशी सध्या तरी शक्यता दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील कळायला फार मोठे-मोठे राजकारणी थकले आहेत. एखाद्या माणसाबद्दल किंवा एखाद्या पक्षाबद्दल त्यांचे टाईमटेबल भल्या-भल्यांना समजलेले नाही आणि मी तर सामान्य माणूस आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.