विशाल पाटील कसे विजयी झाले हे जाहीरपणे सांगू शकत नाही : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : भाजपने वसंतदादांचे घर फोडले, हा आरोप तथ्यहीन
Chandrakant Patil
चंद्रकांत पाटीलpudhari photo
Published on
Updated on

सांगली : विशाल पाटील लोकसभा निवडणुकीत कसे विजयी झाले, हे मी जाहीरपणे सांगू शकत नाही. लोकसभेतील विजय ही विशाल पाटील यांच्यासाठी लॉटरी होती, असे वक्तव्य भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. भाजपने वसंतदादा पाटील यांचे घर फोडले, या त्यांच्या आरोपात तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, विशाल पाटील यांची ताकदच होती, तर मग लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत ते का विजयी झाले नाहीत? प्रत्येकवेळी स्थिती बदलते. तशी यावेळी ती बदलली, त्यांच्या ‘फेव्हर’मध्ये गेली, ते विजयी झाले. अपक्ष खासदार झालो म्हणजे मी राजा झालो, अशी भावना त्यांच्यात तयार झाली आहे. ते सर्वच विषयात टिपणी करू लागलेत. ते म्हणाले, जयश्री पाटील या काही वयाने लहान नाहीत, की कोणी तरी चुकीचे मार्गदर्शन केले आणि त्यांनी निर्णय घेतला, असे काहीही झालेले नाही. त्यांनी खूप दिवस विचारमंथन केले. कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. खासदार विशाल पाटील यांना वाटते की, जयश्री यांना काही कळत नाही. भाजपच्या प्रभावाखाली त्यांनी निर्णय घेतला. मात्र तसे काही झाले नाही. भाजपच्या प्रभावाखाली त्यांनी पक्षप्रवेश केलेला नाही. काँग्रेसनेच त्यांना पक्षातून काढले. बाकीच्या ठिकाणी निवडणुका झाल्या की, बंडखोर उमेदवाराला महिन्यात परत पक्षात घेतले जाते, पण जयश्री पाटील यांना काँग्रेसमध्ये परत घेण्याचे नाव घेईनात. विधानसभा निवडणुकीला काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांचाच दावा होता. पण पक्षाने तो डावलला.

भोंग्याचा आवाज; नियमांचे पालन व्हावे

भोंग्याच्या आवाजाबाबत न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत. शासनाने नियम केलेले आहेत. त्यांचे पालन होणे गरजेचे आहे. हिंदू व मुस्लिम यांच्यातील काही विषय हे बसून सामंजस्याने सोडविण्याचे आहेत. दरवेळी त्यात राजकारण आणणे योग्य नाही, असे उत्तर मंत्री पाटील यांनी एका प्रश्नावर दिले.

हिंदीची सक्ती नाही

केंद्र शासनाचा तीन भाषा शिकवण्याचा प्रस्ताव आहे. हिंदी या विषयाची सक्ती केलेली नाही. हिंदी सक्तीवरून केवळ भुई धोपटण्याचे काम चालले आहे. देशाच्या निम्म्याहून अधिक भागात हिंदी भाषा वापरली जाते. त्यामुळे हिंदी शिकणे चांगलेच आहे. मराठी भाषेवरून राजकारण करणार्‍यांची मुले कोणत्या शाळेत, कोणत्या माध्यमात शिकताहेत हे जाहीर करावे, असे आव्हानही मंत्री पाटील यांनी दिले.

उध्दव-राज एकत्र आल्यास व्यूहरचना ठरेल

ठाकरे शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभव समोर दिसत आहे. मुंबईतील शिवसेनेचे 75 नगरसेवक शिंदे शिवसेनेत गेले आहेत. ठाकरे सेनेला आता नव्याने उमेदवार शोधावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांना आता राज ठाकरे यांची आठवण झाली आहे. उध्दव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे एकत्र आल्यावर भाजपची व्यूहरचना ठरेल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

विशाल यांच्या भाजप प्रवेशावर गुगली

विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर व जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश, वसंतदादांचे घर फोडल्याचा खासदार विशाल पाटील यांचा आरोप यावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एक गुगली टाकली. ते म्हणाले, ‘विशाल पाटील यांचा दावा आहे का, की ते भविष्यात भाजपमध्ये येणार नाहीत.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news