

विटा : येत्या वर्षभरात खानापूर मतदारसंघातील सगळे नेते एकत्र यावेत, असा संकल्प मी विट्याच्या राजाच्या चरणी केला आहे. मग कोणीही विरोधक राहणार नाही, असे विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले. येथील विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी शनिवारी रात्री मंत्री चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर, आमदार सुहास बाबर, विनोद गोसावी, विनोद गुळवणी, उत्तमराव चोथे, शिवाजीराव हारगुडे, विनय भंडारे, महेश चोथे आदी प्रमुख उपस्थित होते.
मंत्री पाटील यांनी आरती झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज कोणाचे पक्षप्रवेश वगैरे? यावर ते हसत म्हणाले, आता या मतदारसंघात काही शिल्लकच उरले नाहीत. मला कोणीतरी सांगितलं, हा बाप्पा पावतो. त्यामुळे मी अशी प्रार्थना केली की, आमच्यासोबत जे आहेत, त्या सगळ्यांची मनं जुळावीत, ते सगळे एकाच दिशेने काम करावेत. मात्र खानापूर मतदारसंघात भाजपअंतर्गतच खुर्द आणि बुद्रुक असा प्रकार सुरू आहे. मंत्री पाटील म्हणाले, जसं एका घरात सर्वांचे एकमेकांशी पटतेच असं नसतं. कारण ती जिवंत माणसं असतात. तसंच पक्षातही असतं अर्थात ते विकोपाला जाऊ नयेत यासाठी मोठ्या माणसांनी प्रयत्न करायचे असतात.
येत्या वर्षभरात खानापूर मतदारसंघातील सुहास, गोपीचंद पडळकर, त्यांचे बंधू ब्रम्हदेव पडळकर, वैभव पाटील, तिकडे देशमुख असे सगळे एकत्र यावेत, असा संकल्प मी विट्याच्या राजाच्या चरणी केला आहे. मग इकडे कोणी विरोधकच राहत नाहीत. बघूया काय होतंय ! असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी बाप्पा हे घडवेल असे वाटत नाही, अशी पुष्टीही मंत्री पाटील यांनी जोडली. मंत्री पाटील पुढे म्हणाले, महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये विसंवाद नाही. ते एकदिलाने काम करतायेत. आरक्षणासह कोणत्याही मुद्द्यांवर शून्य विसंवाद. उलट ते टोकाचे सहकार्य करताहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांनीही परवाच, वेगळे लढणार असे जाहीर केले आहे. नेता त्याची लोकसभा, विधानसभा काढतो. त्यामुळे सगळ्यांना वेगळं लढू द्यावं आणि पुन्हा निवडून आल्यावर एकत्र यावं. मात्र काहीही झालं तरी स्थानिक संस्था निवडणुका या पक्षाच्या चिन्हावरच लढवल्या जातील, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.