

सांगली : सांगली महानगरपालिका स्थापन झाल्यापासून 1998 ते 2018 पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता भोगली. या सत्ताकाळात सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांची पीछेहाट झाली. मात्र या तीनही शहरांचा विकास खऱ्या अर्थाने भाजपच्या सत्ताकाळात सुरू झाला. त्यामुळे मतदार पुन्हा भाजपलाच विजयी करतील. महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल. महापालिकेत बहुमतासाठी 40 जागांची गरज असून भाजपला किमान 55 जागा मिळतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली महापालिका क्षेत्रातील नागरिक काँग्रेस, राष्ट्रवादीला (सध्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) कंटाळले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत नागरिकांनी त्या दोन्ही पक्षांना नाकारले. महापालिकेत भाजप स्वबळावर सत्तेत आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिका क्षेत्राच्या विकासाला सुरुवात केली. महापालिकेत भाजपला सत्ता द्या, आम्ही विकास करून दाखवू, असे आश्वासन आम्ही 2018 च्या निवडणुकीत दिले होते. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर लगेचच 100 कोटी रुपयांचा विशेष निधी महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी दिला. यापूर्वी असा विकास निधी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कधी मिळाला होता का?
सांगलीच्या शेरीनाल्याचा प्रश्न अनेक वर्षांचा आहे. तो आता मार्गी लागत आहे. मार्च महिन्याच्या आत शेरीनाला प्रकल्पासाठी 93 कोटी रुपयांची तरतूद होणार आहे. पूरनियंत्रण तसेच शहर, उपनगरांत साचून राहणाऱ्या पाण्याचा प्रश्नही भाजपचे सरकारच दूर करत आहे. 592 कोटींच्या कामांच्या निविदांची प्रक्रिया झालेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ही कामे सुरू होतील. कवलापूर विमानतळ जागेत कोणाचे हितसंबंध लपले होते, हे सांगलीकरांना पुरते माहिती आहे. भाजप सरकारने काहींचा कुटिल डाव हाणून पाडला. कवलापूर विमानतळ आम्ही सुरू करूच, पण सांगलीतही कायमस्वरूपी तीन हेलिपॅड बांधणार आहोत. महापालिका क्षेत्रातील रस्ते, रिंग रोड, आयटी पार्क, वारणा उद्भव पाणी योजना मार्गी लावणार आहोत. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी दहा कोटी रुपयांचा मॉल सांगलीत उभारणार आहोत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. महापालिकेच्या शाळा अधिक दर्जेदार होतील. स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर बनवणार आहोत. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांचा समतोल विकास साधणार आहोत. त्यामुळे महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येणार आहे, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.