

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन व्यवहाराबाबतच्या चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर येईल. त्यापूर्वी बोलणे उचित होणार नाही. पुण्यातील 22 जमिनींच्या व्यवहाराच्या फायली तपासायला घेतल्या आहेत, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
‘आयर्विन’ला पर्यायी समांतर पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यात अठराशे कोटींची जागा तीनशे कोटींना खरेदी केली असून स्टॅम्प ड्युटीही अवघी पाचशे रुपये भरली असल्याच्या आरोपांवर मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही चुकीच्या प्रकाराला क्षमा करत नाहीत. त्यांच्या जवळच्या लोकांनी जरी चुकीचे काम केले, तर त्यांनाही ते माफ करत नाहीत.
ते म्हणाले, ‘आयजीआर’चे सहायक यांची समिती नियुक्त झाली आहे. केवळ एक नव्हे, तर पुण्यात 22 वेगवेगळ्या जमिनींच्या व्यवहाराच्या फायली तपासायला घेतल्या आहेत. ‘आयजीआर’च्या चौकशीत स्टँप पेपरवरील खरेदीची माहिती समोर येईल. देवेंद्र फडणवीस हे असे नेते आहेत, की जे चूक ते चूक आणि बरोबर आहे, त्याच्या पाठीशी ताकदीने उभे राहतात.
पार्थ पवार यांच्या कंपनीच्या व्यवहाराबाबत विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. पण कोणीही कोणाची पाठराखण केलेली नाही. चौकशीनंतर एखाद्या वेळेस त्यामध्ये काही नाही, असेही निष्पन्न होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जे घटकपक्ष आहेत, त्यांच्यावर अन्याय होत नाही. मुंबईतील कार्यक्रमानंतर गृहमंत्री अमित शहांसह आम्ही बोलत होतो. मात्र गृहमंत्री शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. ज्यांच्या साहाय्याने भाजप हा पक्ष मोठा झाला, त्यांना सोडून देणे ही आमची संस्कृती नसल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
मंत्री पाटील म्हणाले, दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी, ज्या जागांवर एकमत होईल तिथे महायुती होईल, जिथे एकमत होणार नाही, तिथे स्वबळावर लढण्यात येईल. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होतील, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत आणि महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. महायुतीतील घटकपक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढविल्या जातील. इच्छुकांची संख्या अधिक आहे, त्याठिकाणी कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्यांना दुखावणे योग्य होणार नाही. राज्यभरात 60 ते 70 ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे. जिथे एकमत होईल, तिथे एकत्र लढू. जिथे युती होणार नाही, तिथे स्वबळावर लढण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.