

वारणावती : सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा... उंचावरून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे... नागमोडी वळणांनी पठारावर पोहोचणारी वाट... सभोवती गर्द हिरवाई... गळाभेट घ्यायला खाली आलेले ढग... झिरमाट घेऊन येणारा गार-गार वारा... कधी झोंबणारा, तर कधी थंडी देणारा... मिनी महाबळेश्वरचा हा नजारा... मुक्काम पोस्ट गुढे पाचगणी... सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर... पावसाळी पर्यटनाच्या आनंदयात्रींची गर्दी.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस पठार उंच ठिकाणांपैकी एक. चांदोली राष्ट्रीय उद्यानाजवळ. सध्या या परिसरात रोज होतोय ऊन-पावसाचा नजाकतीचा खेळ. नजर फिरेल तिकडे हिरवीगर्द वनराई. गुढे-पाचगणी पठारावर जाताना पूर्वेकडून रांजणवाडी, सावंतवाडी, तर पश्चिमेकडून गेल्यास भाष्टेवाडी, येसलेवाडी येथील घाटातून प्रवास करावा लागतो. या दोन्ही घाटातील नागमोडी वळणे मनभावनच. रस्त्यांची वळणदार नक्षी पुन्हा येण्याचं आवतन देते. रंगीबेरंगी रानफुलांचा बहर पाहत गाड्या वळत राहतात. त्या थबकतात. गती मंदावते. गाड्या थांबतात. यात्रेकरू आनंदित होतात. एक दिवस मुक्काम करून तुम्ही हा संपूर्ण परिसर पाहू शकता. पावसाळ्यातील ओलेचिंब चित्र मनात कोरले जाते.
मेणी खोर्यामध्ये उंच उंच डोंगरावर येथे रोप वे
धबधब्यांच्या ठिकाणी पूल.
पॅराग्लायडिंगसाठी उत्तम वातावरण आणि पठार.
खुले पठार, डोंगरउतारावर बाग, वनौषधी वनस्पतींची लागवड.
खासगी मालकीच्या शेकडो एकर जमिनीत पर्यटन वाढीला मोठा वाव.