Chandoli National Park : चांदोलीच्या पर्यटनाला सुरक्षिततेची गरज

मद्यपी पर्यटकांचा त्रास; पोलिस व वन विभागाचे दुर्लक्ष ; उपाययोजना आवश्यक
Chandoli National Park
Chandoli National Park
Published on
Updated on

आष्पाक आत्तार

वारणावती : चांदोली परिसरातील पर्यटन दिवसेंदिवस वाढत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. सुटीच्या दिवशी तसेच आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार, रविवार येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असून काही मद्यपी पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिक नागरिक व इतर पर्यटक त्रस्त होत आहेत.

वारणा नदी परिसरात व धरणालगतच्या भागात दररोज अनेक पर्यटक पार्टी करण्याच्या निमित्ताने येत आहे. मात्र यातील काही पर्यटकांच्या मद्यप्राशन करून गोंधळ घालणे, काचांच्या बाटल्या फोडून परिसर अस्वच्छ करणे, तसेच धोकादायक कृत्ये करणे अशा प्रकारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून अनेकांना दुखापती झाल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत.

या परिसरात पोलिस व वन विभागाचे दुर्लक्ष असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. येथे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन सर्रास होत आहे. धरण परिसरात फुटलेल्या काचांचा खच साचला असून त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.

यापूर्वीही येथे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुमारे 22 लाख रुपये खर्चून उखळू चेक नाक्यावर पोलिस चौकी बांधण्यात आली आहे. मात्र ही चौकी नावापुरती उरली आहे. धरणाच्या पायथ्याला सांगली पोलिस चौकी आहे. धरण परिसरात कोणतीही दुर्घटना घडली की, शाहूवाडी की कोकरूड पोलिस असा हद्दीचा प्रश्न निर्माण केला जातो. दोघांच्या दुर्लक्षामुळे येथील पर्यटनाला बेशिस्तीचे ग्रहण लागले आहे.

चांदोली पर्यटन सुरक्षिततेसाठी या उपाययोजनांची गरज.

  • धरण परिसर, वारणा नदीकाठ व पर्यटनस्थळी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा.

  • उखळू चेक नाक्यावरील पोलिस चौकी तातडीने पूर्णवेळ कार्यरत करावी.

  • शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी विशेष पोलिस गस्त वाढवावी.

  • मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.

  • मद्यपान व काचांच्या बाटल्यांवर बंदी लागू करावी.

  • वन विभाग व पोलिसांनी संयुक्त नियंत्रण पथक तयार करावे.

  • पर्यटनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सतत देखरेख ठेवावी.

  • धोकादायक ठिकाणी इशारा फलक व सुरक्षा सूचना लावाव्यात.

  • पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक व आपत्कालीन मदत केंद्र सुरू करावे.

  • नियमित स्वच्छता मोहीम राबवावी.

  • पर्यटक नोंदणी व्यवस्था व प्रवेश नियंत्रण प्रणाली सुरू करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news