

शिराळा शहर : चांदोली धरण परिसराचा नागार्जुन व वृंदावनच्या धर्तीवर पर्यटनस्थळ म्हणून सर्वांगीण विकास करून विशेष पर्यटन आराखडा तयार करावा, तसेच चांदोली व वारणावती येथील सुरू असलेली विश्रामगृहांची कामे तातडीने पूर्ण करून ती पर्यटकांसाठी खुली करावीत, अशी प्रमुख मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली.
यावेळी त्यांनी शिराळा व वाळवा तालुक्यातील विविध जलसंपदा, सिंचन व पायाभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्नही मांडले. आमदार देशमुख यांनी वारणा नदीवरील मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करून संरक्षण भिंत, गॅबियन वॉल व नवीन रस्त्याची उभारणी करण्याची मागणी केली. या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन धनटेक पाणीपुरवठा संस्थेचा खराब झालेला ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही त्यांनी मागणी केली.
वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजना टप्पा-१, भाग-३ मध्ये वाळवा तालुक्यातील सुरुल व ओझर्डे गावांचा समावेश करून घबकवाडीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करण्यासाठी सर्वेक्षण करावे. तसेच शिराळा तालुक्यातील करमाळे गावाला एका फिडरवरून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली. येडेनिपाणीच्या उत्तर भागातील कुंभारदरा तलावात वाकुर्डे योजनेचे पाणी सोडण्याचा समावेश करावा, तसेच बादेवाडी रेड कालव्यासाठी संपादित जमिनीचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशीही मागणी त्यांनी केली.