

वारणावती : चांदोली धरणाचे तांत्रिक वर्ष सुरू होऊन सात महिने झाले. निम्म्यापेक्षा अधिक कालावधी संपला तरीही धरणात 28.42 टीएमसी पाणीसाठा आहे. यामुळे जूनअखेर पाण्याची चिंता भासणार नाही, असे सध्या चित्र आहे.
34.40 टीएमसी क्षमता असणाऱ्या धरणात 8 महिन्यांनंतरही मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे 1 जूनरोजी सुरू होणाऱ्या नवीन तांत्रिक वर्षातही धरणात समाधानकारक पाणीसाठा राहणार आहे. यंदा पाणलोट क्षेत्रात सरासरी 2931 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण यंदाही शंभर टक्के भरले होते. चार महिन्यांत केवळ 5.98 टीएमसी पाणी खर्च झाले आहे. म्हणजेच महिन्याला साधारण 1.48 टीएमसी पाणी वापरले गेले आहे. आता उन्हाळा सुरू झाला की, मागणी वाढते. त्यानुसार पुरवठा करावा लागतो. त्यामुळे धरणातून महिन्याकाठी साधारण तीन ते चार टीएमसी पाणी संपते. सध्या फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत किमान महिन्याला चार टीएमसी पाणी वापरले गेले तरीही साधारण 35 टक्के पाणीसाठा शिल्लक राहणार आहे.