

वारणावती : चांदोली परिसरात पावसाची संततधार कायम आहे. धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 39 मिलिमीटर, तर गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासांत 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पाऊस आणि वाढणारा पाणीसाठा यामुळे धरणाचे दरवाजे दुपारी दोन वाजता उघडण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे.
626.90 मीटर ही धरणाची सांडवा पातळी आहे. सध्या धरणाची पाणीपातळी 617.95 मीटर आहे. जवळपास 8.95 मीटर पाणी सांडवा पातळीपेक्षा कमी आहे. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे या संततधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सध्या 11,157 क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक धरणात होत असून पाणी पातळी 617.95 मीटरवर पोहोचली आहे. धरणात सध्या 26.40 टीएमसी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 78 आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 700 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा 1212 मिलिमीटर पाऊस येथे पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 512 मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे. पाणीसाठाही दुप्पट आहे.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी सांडवा पातळीच्या वर आल्यानंतर जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून येत्या चोवीस तासात वक्र द्वाराद्वारे 2840 क्यूसेकपर्यंत व विद्युतगृहातून 1660 क्यूसेक, असा एकूण 4500 क्यूसेकपर्यंत विसर्ग वारणा नदीपात्रात होणार आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. पाऊस सुरू राहिल्यास किंवा पावसाचे प्रमाण वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी-जास्त होईल, त्यामुळे नदीकाठच्या गावाने सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.