

वारणावती : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. धरणाने 618.90 ही सांडवा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शनिवार, दि. 5 रोजी दुपारी 12.30 वाजता चांदोली धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडून 2,870 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय वीजनिर्मिती केंद्रातून 1,630 क्युसेक विसर्ग सुरू असून एकूण 4 हजार 500 क्युसेक वेगाने वारणा नदीपात्रात विसर्ग होत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.
पावसाचे प्रमाण पाहून धरणातील विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जून महिन्यात पाणीसाठ्यात जवळपास दहा टीएमसी वाढ झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारा संततधार पाऊस आणि पाण्याची आवक, यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. शनिवारी सकाळी धरणाने सांडवा पातळी ओलांडली.
पावसाचा जोर कायम असल्यामुळे शनिवारी दुपारी 12.30 वाजता धरणाचे चारही वक्र दरवाजे 0.25 मीटरने उघडून 2,879 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्या-टप्प्याने हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. चांदोली हे महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे मातीचे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 34.40 टीएमसी आहे. दरवर्षी हे धरण शंभर टक्के भरते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण हे तीन ते पाच हजार मिलिमीटरपर्यर्ंत आहे.
धरणातील पाण्यावर सोळा मेगावॅट क्षमतेचा चांदोली, तर चार मेगावॅट क्षमतेचा सोनवडे जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. त्यामुळे चांदोलीतून बावीस मेगावॅट वीजनिर्मिती होते. सध्या धरणाची पाणी पातळी 619.20 मीटर असून धरणात 27.30 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या चोवीस तासात 56 मिलिमीटर पावसासह आजअखेर 1,292 मिलिमीटर पाऊस येथे पडला आहे.