Sangli News : चांदोलीत शेतकऱ्यांचे जनआंदोलन; 21 दिवसांचा अल्टिमेटम्‌‍

नागरिकांच्या जीवितास धोका; भीतीपोटी नागरिक स्थलांतराच्या मन:स्थितीत; त्वरित निर्णय घ्या
Sangli News
चांदोलीत शेतकऱ्यांचे जनआंदोलन; 21 दिवसांचा अल्टिमेटम्‌‍
Published on
Updated on

वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील गावांमध्ये वाढत्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण असून नागरिकांच्या जीवितासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर चांदोली अभयारण्याच्या खुंदलापूर नाक्यावर वन्यप्राणी हल्ला प्रतिबंध व शेतकरी संरक्षण जनचळवळ समितीतर्फे मंगळवारी तीव्र जनआंदोलन करण्यात आले. आंदोलनात परिसरातील शेतकरी व युवक सहभागी झाले होते.

बिबटे, रानगवे आदी वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढलेला वावर धोकादायक ठरत असून निष्पाप नागरिकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. लहान मुलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत अनेकांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी या आंदोलनात व्यक्त करण्यात आली.

वन्यप्राण्यांच्या सततच्या वावरामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाकडून अपुरी व विलंबाने नुकसानभरपाई मिळत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. भीतीपोटी काही कुटुंबांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केल्याने सामाजिक अस्थिरता वाढत आहे. शाळकरी मुलांमध्येही मानसिक भीती निर्माण झाली आहे.

यावेळी समितीचे अध्यक्ष तानाजी सावंत यांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका करत क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, वाघांचे रिल्स सोशल मीडियावर टाकून प्रसिद्धी मिळवली जाते, तसेच शेतकऱ्यांवर होणारे हल्ले व नुकसानही समाजासमोर मांडावे. या आंदोलनातून जंगल सत्याग्रहाची सुरुवात झाली असून वन्यजीव व प्रादेशिक वादात शेतकरी भरडला जात आहे. वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी आवश्यक यंत्रणाही उपलब्ध नाही. यावेळी सुहास घोडे-पाटील, ॲड. रवी पाटील, राजू वडाम, शिवाजी पाटील, सावळा पाटील, शंकर मोहिते, बाळासाहेब नांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात तालुकाध्यक्ष संजय पाटील, तानाजी भोसले, विजय पाटील यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news