Chain Snatching Case | चेन स्नॅचिंग; सराईत चोरटा जेरबंद
इस्लामपूर : काही दिवसांपूर्वी इस्लामपूर शहरात धुमाकूळ घालणार्या आणि जमिनीवर सुटलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तम राजाराम बारड (रा. धामोड, ता. राधानगरी) या चेन स्नॅचिंग करणार्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून 21.1 गॅ्रम वजनाचे सोन्याचे दागिने, असा सुमारे 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर व कर्मचार्यांचे एक पथक तयार केले. चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणार्या संशयितांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पथकास दिले होते. त्यानुसार सांगली विभागात गस्त सुरू असताना जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलिस कर्मचारी संदीप गुरव, सूरज थोरात यांना सराईत गुन्हेगार उत्तम बारड हा अंकली (ता. मिरज) येथील धनश्री लाकडी कलाकृती केंद्राजवळ दोन दिवसापूर्वी इस्लामपूर येथून चेन स्नॅचिंग करून मिळालेला चोरीचा माल विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने सापळा रचला असता असता उत्तम बारड हा तेथे आल्याचे दिसले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उत्तम राजाराम बारड असे आपले नाव सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पँटच्या खिशामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले. त्याच्याकडे या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने अंकली गावातून चोरी केलेली दुचाकी घेऊन दोन दिवसापूर्वी इस्लामपूर शहरातील वाघवाडी फाटा आणि न्यायालयासमोर सकाळी फिरावयास आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून चोरल्याची कबुली दिली. संशयित उत्तम बारड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांत घरफोडी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत सुरेखा निवास गायकवाड (रा. गुरुदत्त कॉलनी, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली होती.
चेन स्नॅचिंगच्या घटनांत वाढ
गेल्या काही दिवसांपासून इस्लामपूर परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दिवसाढवळ्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे पसार होत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांची गांभीर्याने दखल घेत इस्लामपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्याने सराईत चोरटा जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले.

