

सांगली : केंद्र सरकारने उसाचा रस तसेच सिरपपासून बनवलेल्या इथेनॉलचे दर वाढवले आहेत. त्यामुळे दरवाढ करा, यासाठी आग्रही असलेल्या साखरसम्राटांची मागणी मान्य झाली आहे. याचा थेट फायदा सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना होणार आहे. जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलचे उत्पादन वाढीस मदत होणार आहे. आता इथेनॉलच्या किमतीत सरासरी तीन टक्क्याने वाढ करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने कारखान्यांना सातत्याने इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले आहे. तसेच भांडवल आणि गुंतवणूक परतावा देण्याचा निर्णय घेतला होता. याचा लाभ घेऊन राज्यात सहकारी आणि खासगी मिळून 111 कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारले होते. विशेषत: ‘ई 20’ कार्यक्रमांपासून साखर उद्योगासाठी इथेनॉल चांगलेच चर्चेत राहिले. तीन वर्षांपूर्वी शिल्लक साखरेचा साठा कमी करण्यासाठी सरकारने इथेनॉल उत्पादन करण्यासाठी साखर कारखान्यांना सवलतींचा ‘हात’ जाहीर केला. मात्र अनेक सहकारी कारखान्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षाच राहिली होती.
आता केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणार्या इथेनॉलच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार उसाच्या रसापासून तयार होणार्या इथेनॉलची किंमत प्रतिलिटर 65.61 रुपये करण्यात आली आहे. बी-हेवी मळीपासून तयार करण्यात येणार्या इथेनॉलची किंमत प्रतिलिटर 60.73 रुपये आणि सी-हेवी मळीपासून तयार करण्यात येणार्या इथेनॉलची किंमत 57.97 रुपये निश्चित करण्यात आली आहे. याचा साखर कारखान्यांना मोठा लाभ होणार आहे. जिल्ह्यात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना साखराळे, हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, उदगिरी शुगर्स लि. आणि श्री श्री राजेवाडी या दोन खासगी कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प आहेत. या कारखान्यांमधील प्रकल्प गुंतवणूक, इथेनॉलची उत्पादन क्षमता याची माहिती सोबतच्या चौकटीत दिली आहे.
सन 2019-2020 च्या गळीत हंगामापासून देशात शिल्लक साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात राहिला होता. सन 2022-23 चा हंगाम तर नवीन हंगामच मुळात तब्बल 140 लाख टन साखर साठ्याचे ओझे घेऊन सुरू झाला होता. त्यात उत्पादित होणार्या 335 लाख टन साखरेची भर पडली. देशात साखरेचा वार्षिक खप आणि मागणी साधारणपणे 255 लाख टन राहते. म्हणजेच तो हंगाम संपताना देशात साधारणपणे 225 लाख टन साखर साठा शिल्लक राहिला. या हंगामात देखील साधारणत: असेच चित्र आहे. वर्षभरापूर्वी सरकारने इथेनॉल उत्पादन आणि उत्पादन आणि पेट्रोलमध्ये मिसळून विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या होत्या. त्यावेळी इथेनॉलचा हमी दर सरासरी 65 रुपये 21 पैसे असा निश्चित केला होता. याचा कारखान्यांना मोठाच दिलासा मिळत होता. इथेनॉलला चांगला दर नाही म्हणणारे कारखानदार साखर साठा कमी व्हावा म्हणून तरी इथेनॉल उत्पादनाकडे वळले होते. मध्यंतरी केंद्र सरकारने उसाचा रस आणि सिरपपासून इथेनॉल निर्मितीस बंदी घातली होती. या निर्णयाचा साखर उद्योगाला मोठाच फटका बसला. मात्र आता ही बंधने शिथिल करण्यात आली आहेत.
सरकारच्या धोरणाचा फायदा घेत जिल्ह्यातील जवळपास सहा साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनाचे प्रकल्प उभारले आहेत. यासाठी या कारखान्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच यासाठी भरमसाट व्याजाने कर्जे काढली आहेत.