

शिराळा शहर : सामाजिक व जातीय सलोखा राखून नागपंचमी उत्सव साजरा करा. सोशल मीडियावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घ्यावी. जी मंडळे याचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला. शिराळा तहसील कार्यालयात आयोजित नागरिक आणि नागमंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते, उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले, तहसीलदार श्यामला खोत, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, तसेच पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक घुगे म्हणाले, कायदा सर्वश्रेष्ठ आहे, त्याचे उल्लंघन होईल, असे कृत्य करू नका. वेळेची मर्यादा ही रात्री आठ वाजेपर्यंत आहे. डीजेची आवाज मर्यादा 45 डेसिबल असावी. त्यापुढे आवाज गेल्यास संबंधित मंडळावर गुन्हे दाखल केले जातील. ध्वनीयंत्र मशीनद्वारे मर्यादा तपासून योग्य ती कारवाई होईल. कर्णकर्कश आवाज आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्पमित्रांनी साहसी प्रकार करू नयेत. रस्ते, वीज, वाहतूक याबाबत जागरूकता असावी. आपत्कालीन सेवेला रस्ता मोकळा करून द्यावा. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुरावा म्हणून त्याचा वापर केला जाईल. सोशल मीडियावर आक्षेपार्ह प्रकार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. उपवनसंरक्षक सागर गवते म्हणाले, नागांचे प्रदर्शन करणे, त्याचे खेळ करणे हा वन्यजीव कायद्यामध्ये गुन्हा आहे. त्याचे प्रदर्शन करून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. वनविभागाने यासाठी कठोर नियमावली जारी केली आहे. ती सर्व मंडळानी अंमलात आणावी.
यावेळी सम्राट शिंदे, श्रीराम नांगरे, रामचंद्र पाटील, सचिन शेटे, यांनी आपले म्हणणे मांडले. बैठकीस पृथ्वीसिंग नाईक, प्रमोद नाईक, रणजितसिंह नाईक, सचिन नलवडे, अभिजित शेणेकर,जयसिंग गायकवाड, लालासाहेब तांबीट, वीरेंद्र पाटील, वैभव कुंभार, वसंत कांबळे, सुधाकर कुंभार, फिरोज मुजावर, धन्वंतरी ताटे, सतीश सुतार, अजय जाधव, राम पाटील, संदीप देशमुख, प्रमोद चौधरी उपस्थित होते. अनेक गावांत नागाचे प्रदर्शन आणि त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होतात. ते प्रसारित करताना ‘शिराळा नागपंचमी’ असा उल्लेख करतात. त्यामुळे इथल्या मंडळावर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे अशा लोकांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी श्रीराम नांगरे यांनी अधीक्षक घुगे यांच्याकडे बैठकीत केली.