

सांगली : शहरातील दत्त-मारुती रस्त्यावर दुकानासमोरील मंडपाचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाशी वाद घालून सहायक आयुक्तांवर पेट्रोल ओतल्याप्रकरणी व्यापाऱ्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश गोविंदराव तनवानी असे व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत सहायक आयुक्त सचिन सागावकर यांनी फिर्याद दिली आहे.
दत्त-मारुती रस्त्यावर दुकानांसमोर पाच फूट अंतरात तात्पुरते स्टॉल उभारण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, स्टॉलवर मंडप किंवा शेड उभारण्यास महापालिकेने मनाई केली होती. तरीही काही व्यापाऱ्यांनी मंडप उभारल्याचे निदर्शनास येताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शनिवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला. सकाळी साडेनऊच्या सुमारास उपायुक्त अश्विनी पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक तथा सहायक आयुक्त सचिन सागावकर, सहायक आयुक्त ऐश्वर्या माने यांनी दत्त मारुती रस्त्यावर पाहणी केली. पाहणीदरम्यान तीन ठिकाणी स्टॉलवर मंडप उभारल्याचे आढळून आले होते. संबंधितांना मंडप स्वतःहून हटविण्याची सूचना देण्यात आली. अन्यथा महापालिका कारवाई करेल, असा इशाराही देण्यात आला होता.
यावेळी न्यू दिनेश दुकानासमोरील मंडप आणि शेड हटविण्यावरून व्यापारी तनवानी व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. याचवेळी संबंधित व्यापाऱ्याने बाटलीतून आणलेले पेट्रोल सहायक आयुक्त सचिन सागावकर यांच्या अंगावर ओतले. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावरही पेट्रोल ओतून घेतल्याने खळबळ उडाली. घटनेनंतरही महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू ठेवत जेसीबीच्या साहाय्याने मंडप हटविला होता. त्यानंतर सहायक आयुक्त सागावकर यांनी शहर पोलिसांत व्यापारी तनवानी याच्याविरोधात फिर्याद दिली. यात तनवानी याने ज्वालाग्रही पदार्थ माझ्या व स्वतःच्या अंगावर ओतून घेऊन आत्महत्येची धमकी दिली. तसेच तुम्हाला काम करू देणार नाही, असे म्हणत शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.