

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथील रस्त्याच्या कामावरून मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन गटात वाद उफाळून आला. या वादातून ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांसह तिघांवर धारदार शस्त्रे, काठी, लोखंडी गजाने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी दोन्ही गटाने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार पोलिसांनी 16 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्यात ग्रामपंचायत सदस्य अविनाश विक्रम पाटील (वय 30), मनोहर वसंत पाटील (40) आणि संभाजी रंगराव पाटील (48, सर्व रा. बुधगाव) हे जखमी झाले होते. तर दुसर्या गटातील सूरज गोसावी हाही जखमी आहे. रात्री उशिरा दोन्ही गटावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात असून संशयितांला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी सांगितले. जखमी अविनाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय (मेजर) गोसावी, अजय गोसावी, सूरज गोसावी, सागर गोसावी, मुकेश गोसावी, संदीप गोसावी, प्रकाश गोसावी व सुखदेव गोसावी या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
संशयितांनी बेकायदा जमाव जमवून वाद घातला. संदीप गोसावी या दोघांनी फिर्यादीला संपवा रे म्हणून हल्ला केला. संदीप याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच पिस्टल घेऊन तो अंगावर धावून आला. विजय गोसावी याने संभाजी पाटील यांच्या डोळ्यावर मारून जखमी केले. तर अजय गोसावी याने मनोहर पाटील यांच्या हातावर काठी मारली. प्रकाश गोसावी याने फिर्यादीच्या डोक्यात बाटली मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर सूरज गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोहर पाटील, संभाजी पाटील, पवन पाटील, अविनाश पाटील, संदीप निकम, विनायक शिंदे, ऋषभ पाटील, विक्रम पाटील व अनोळखी दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी बेकायदा जमाव जमवून सूरज यांची बहीण उज्ज्वला यांना शिवीगाळ, दमदाटी केली.