

आटपाडी : आटपाडीतील ग्रामीण रुग्णालयाजवळच्या सिद्धनाथ ऑटो गॅरेजला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत गॅरेजमधील साहित्य आणि एक मोटार जळून खाक झाली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सिद्धनाथ गॅरेजचे मालक अजित चव्हाण हे रविवारी रात्री काम संपवून मोटार गॅरेजमध्ये उभी करून घरी गेले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गॅरेजच्या शटरमधून अचानक धुराचे मोठे लोट बाहेर येऊ लागले आणि ही आग सर्वत्र पसरली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी शटर उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्र्याचे शेड आणि शटर तापल्याने ते उघडता आले नाही. दरम्यान, नगरपंचायतीचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे गॅरेजमधील सर्व साहित्य, ऑइल ड्रम, सुटे पार्ट्स, टूल्स आणि मोटार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यानंतर अग्निशामक दल पोहोचले आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू झाले. पाण्याचा मारा करत काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत गॅरेज पूर्णपणे जळून खाक झाले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.