

सांगली : बस्तवडे (ता. तासगाव) येथे गांजाच्या शेतीवर छापा टाकून 15 लाखांचा 150 किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी अजय नारायण चव्हाण (वय 35, रा. बस्तवडे) यास अटक करण्यात आली आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक नितीन सावंत व पथकाने ही कारवाई केली.
बस्तवडे येथे एकाने गांजाची शेती केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक कुमार पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी चव्हाण याच्या शेतात छापा टाकला. त्यावेळी मका आणि हत्ती घास पिकामध्ये सात ते आठ फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली.
याबाबत चौकशी केली असता चव्हाण याने शेतात गांजाची लागवड केल्याची कबुली दिली. चव्हाण याने यापैकी काही गांजाची झाडे शेतात उपटून टाकली होती. काही दिवसांत त्याची विक्री करणार असल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी शेतातील सर्व गांजाची झाडे जप्त केली. 10 हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे 15 लाख रुपयांची 150 किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जिल्ह्यातील गांजा तस्करीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने पर्दाफाश केला आहे. गांजाच्या तस्करीबाबत माहिती असल्यास पोलिसांना द्यावीत. माहिती देणार्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कारवाईत सहायक निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक कुमार पाटील, हवालदार अमोल ऐदळे, आमसिद्धा खोत, बाबासाहेब माने, संदीप पाटील, श्रीधन बागडी, सुशील मस्के, अभिजित माळकर, संकेत कानडे, रोहन गस्ते, विनायक सुतार, ऋषिकेश सदामते, सोमनाथ पतंगे, ऋतुराज होळकर व सुमित सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
गांजा शेतीसाठी मका, हत्तीघासची मदत
चव्हाण याने गांजाची शेती करण्यासाठी त्यांच्या घराशेजारी असणार्या शेताची निवड केली. गांजाच्या शेतीची कोणाला माहिती मिळू नये, यासाठी त्याने या शेतामध्ये मका आणि हत्तीघासची लागवड केली होती. या दोन्ही पिकामध्ये त्याने गांजाची लागवड केली होती. परंतु चव्हाण याच्या गांजा शेतीची माहिती पोलिसांना मिळाली आणि याचा भांडाफोड झाला.
गांजा शेतीवरील सर्वात मोठी कारवाई
जिल्ह्यात अनेक ठिकाणी गांजा शेतीवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु ती किरकोळ स्वरूपात होत होती. बस्तवडेमध्ये 15 गुंठे शेतामध्ये गांजाची शेती करण्यात आली होती. गांजा शेतीवर झालेल्या कारवाईमध्ये ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले.