

तासगाव : वासुंबे (ता. तासगाव) येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह 58 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी दत्तात्रय बाळासोा थोरबोले (वय 40) यांनी तासगाव पोलिसांत अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी : फिर्यादी थोरबोले हे वासुंबे येथील सरस्वतीनगर गल्ली क्रमांक चारमध्ये राहतात. थोरबोले दि. 1 रोजी कामानिमित्त कुटुंब घराला कुलूप लावून गेले होते. ते कुटुंबासह दि. 6 रोजी दुपारी दीड वाजता परत आले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातील रोख चाळीस हजार व अठरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले. चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सरस्वतीनगर आणि गणेश कॉलनी या वसाहती नोकरदार व व्यावसायिक यांच्या आहेत. येथे बंद घरांना टार्गेट करून चोरट्याचा डल्ला मारण्याचा उद्योग सुरू आहे. गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी काही ठिकाणी घरफोड्या केल्या, मात्र त्या अद्याप उघडकीस आणण्यात पोलिस अयशस्वी ठरले आहेत. त्यावरून संताप व्यक्त होत आहे.