

सचिन सुतार
बुधगाव : सांगली ते कुमठे फाटा दरम्यान काँक्रीट रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडले आहे. आता ऐन पावसाळ्यात बुधगाव नाका ते माधवनगरदरम्यान दोन्ही बाजूने रस्ता एकाच वेळी खोदल्याने सर्वत्र राडेराड झाली आहे. सोमवारी सायंकाळी रस्त्यावरील चिखलामुळे दहा मिनिटात सहा वाहने घसरून पडल्याने अनेकजण जायबंदी झाले.
बारा किलोमीटरच्या कामासाठी एकशे चार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. मात्र रस्त्याच्या दर्जा राखला जात नसल्याचे आरोप होत आहेत. या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. जानेवारीपासून जूनपर्यंत सहा महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण करून घेणे गरजेचे होते. त्यावेळी रखडलेले काम आता पावसाळ्यात घाईगडबडीत करण्यात येत आहे.
काम करताना वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी एकाच वेळी दोन्ही बाजूला रस्ता करण्यास नागरिकांनी विरोध केला होता. मात्र कंत्राटदाराने मनमानी करत रात्री उशिरा रास्ता खोदला. त्याठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने चिखल होऊन रस्ता निसरडा झाला आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतर पार करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते. महिला दुचाकीस्वार आणि मोपेड चालकांना येथे निसरड्या रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. पेट्रोल पंपाजवळ असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता एकाच वेळी खोदल्याने डांबरी रस्त्यावर चिखल साचला आहे. पाऊस पडल्यानंतर याठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट होते. येथून गडबडीत जाण्याचा प्रयत्न केल्यास वाहने घसरून पडत आहेत. याठिकाणी दिशा दर्शक फलक तसेच कोणतीही सुरक्षा यंत्रणा दिसून येत नाही. मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे.