

सांगली : पुढारी वृत्तसेवा : सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याच्या कमानीजवळ एका महाविद्यालयीन तरुणावर कोयतासदृष्य हत्याराने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. राजवर्धन राम पाटील (वय 18, रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संयजनगर पोलिसांनी तासाभरात तीन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, मयत राजवर्धन पाटील हा वसंतदादा औद्योगीक वसाहतमधील आयटीआयच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे. दोन दिवसांपूर्वी राजवर्धन आणि हल्लेखोरांमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणातून वाद झाला होता.
राजवर्धन पाटील हा गुरुवारी (दि. १२) सायंकाळी पाच वाजता महाविद्यालय सुटल्यानंतर कारखान्यासमोर असणार्या बस थांब्याकडे तो कारखान परिसरातून चालत निघाला होता. यावेळी हल्लेखोर देखील त्याचा माग काढत या परिसरात आले. यावेळी राजवर्धन व हल्लेखोरांमध्ये एकमेकांकडून रागाने बघण्याचा कारणातन जोरदार वादावादी करून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राजवर्धन याने बचाव करण्यासाठी कारखान्याकडे पळ काढला. परंतु संशयितांनी त्याचा पाठलाग करून मानेवर आणि छातीवर दोन ठिकाणी कोयता सदृष्य हत्याराने हल्ला केला. वर्मी घाव बसल्याने राजवर्धन याचा जागीच मृत्यू झाला होता.