

दिघंची ः आटपाडी तालुक्यातील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
आटपाडी तालुका तसा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. सातत्याने या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असते. परंतु यंदा मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली व म्हसवड येथील माण नदीला पूर आला. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला. मे महिन्यात हा तलाव भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. तलावाच्या सांडव्यावरून पांढरेशुभ्र फेसाळलेले पाणी खाली पडत आहे. हे नयनरम्य दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटत आहे.
ब्रिटिश राजवटीत या भागातील लोकांना रोजगार मिळावा व पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, या उद्देशाने हा तलाव बांधण्यात आला. परिसरात ब्रिटिशकालीन बंगल्याचे भग्न अवशेष दिसून येतात. तलावाच्या चारही बाजूस असणार्या ढोकमोड, हिंगणी, देवापूर, पलसवडे आदी गावांतील बरीच शेती पाण्याखाली गेली आहे. तलावाचा परिसर मोठा आहे. कायम रुक्ष व भकास वाटणारा हा परिसर सध्या पाण्यामुळे आल्हाददायक वाटत आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी खाली पडत असल्याने येथे नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
माणदेश हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. औंध संस्थानात या भागाला विशेष महत्त्व होते. या भागात लोकांनी आवर्जून यावे, अशी फार कमी ठिकाणे आहेत. सध्या राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. देश-विदेशातून दुर्मीळ पक्षीही येथे येतात. या तलावाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यास परिसराच्या विकासाला गती मिळेल. पर्यटकांना राहण्याची सोय केल्यास हौशी पर्यटक येथे आवर्जून येतील, येथील अर्थकारणास गती मिळेल.
तलावावर येणारे हौशी पर्यटक फोटो, सेल्फी काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी जात आहेत. तलावाच्या सांडव्याची रुंदी दीड ते दोन फूट असून सांडव्याच्या भिंतीवरून चालणे धोकादायक आहे. मात्र हौशी पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.