

सांगली : जत पंचायत समितीतील बांधकाम विभागाकडील शाखा अभियंत्याने कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. सांगलीतील बायपास पुलाजवळ नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. अवधूत अशोक वडार (वय 27, रा. इस्लामपूर) असे मृताचे नाव आहे. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत समोर आले आहे.
दरम्यान, वडार यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात दाखल होत, राजकीय दबावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
इस्लामपूर येथील अवधूत वडार गेल्या सहा-सात वर्षांपासून जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागामध्ये शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांपासून ते सतत कामाच्या तणावात होते. वरिष्ठ अधिकार्यांचा तसेच राजकीय दबाव असल्याचे ते सांगत होते, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी ते जत येथून निघाले. मात्र सायंकाळी उशिरापर्यर्ंत घराकडे परतले नाहीत. यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सांगलीतील बायपास रस्त्यावरील पुलाखाली एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले. स्पेशल रेस्क्यूच्या जवानांनी नदीपात्रात पुलाखाली उतरून मृतदेह बाहेर काढला.
पोलिसांच्या चौकशीत हा मृतदेह जत पंचायत समितीकडे कार्यरत अवधूत वडार यांचा असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे वडार यांच्या इस्लामपूर व जत येथील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. सांगली शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.