

जत : बोर्गी (ता. जत) येथे अवैध बायोडिझेल साठा व विक्री प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 21 लाख 47 हजार 310 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील कामगार संशयित आरोपी मलक्काण्णा रेवाप्पा कुंभार यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार आगतराव मासाळ यांनी उमदी पोलिसात दिली आहे.
उमदी पोलिस ठाण्याच्या पथकाने केलेल्या तपासात उमदी- विजयपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचा साठा आढळून आला. प्लास्टिकच्या विविध टाक्यांमध्ये साठवलेले बायोडिझेल, डिझेल मोजणीची इलेक्ट्रिक मशीन, मोटारी, पाईप, इन्व्हर्टर, बॅटरी, रोख रक्कम व अन्य साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान संशयित कुंभार याने शेडच्या पाठीमागील बाजूस जमिनीत पुरलेली 12 हजार लिटर क्षमतेची लोखंडी टाकी असल्याची माहिती दिली. जेसीबीच्या सहाय्याने माती बाजूला करून पाहणी केली असता सदर टाकी उघडकीस आली. या ठिकाणाहून मोटारीच्या सहाय्याने डिझेल काढून अवैध विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाले.