Shaktipeeth Highway Protest : बोरगावात कडकडीत बंद

शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात गावकरी आक्रमक
Shaktipeeth Highway Protest
बोरगावात कडकडीत बंद
Published on
Updated on

बोरगाव ः प्रस्तावीत शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात बोरगाव (ता. वाळवा) येथे सोमवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. तसेच शासनाचा निषेध करत या मार्गाला विरोध दर्शविला.

शक्तिपीठ महामार्ग वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा नदीच्या परिसरातील सर्व सुपीक जमिनीतून जाणार असल्याने या परिसरातील शेतकरी पेटून उठला आहे. मार्गाची उंची मोठी असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साठून राहणार असल्याने लगतच्या जमिनी नापीक होणार आहेत. त्याबरोबरच प्रतिवर्षी कृष्णा व वारणा काठाला महापुराचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाचा निषेध व हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी बोरगाव येथील सर्व ग्रामस्थ, शेतकरी व व्यापाऱ्यांनी शक्तिपीठविरोधी संघर्ष समिती आणि समस्त ग्रामस्थांनी केलेल्या आवाहनानुसार बंद पाळण्यात आला.

यावेळी सरपंच जितेंद्र पाटील म्हणाले, उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान करू नका. आधीच सरकार कर्जबाजारी असताना या शक्तिपीठ मार्गाचा घाट का घातला जातो आहे? आम्हाला पैशाची गरज नाही. पुढच्या पिढीसाठी जमिनीची जपणूक करावयाची आहे. यासाठी वेळप्रसंगी टोकाची भूमिका घेऊ.

यावेळी शिक्षक नेते जे.एस.पाटील म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा हा प्रदेश आहे. त्यांचे पत्री सरकार पुन्हा निर्माण होऊ नये, याची दक्षता सरकारने घ्यावी. शेतकरी हा या राज्याचा मालक आहे. मंत्री हे सेवक आहेत. सेवकांनी मालकावर अन्याय करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा शांत असणारा हा तालुका पुन्हा पेटून उठेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news