

सांगली : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी दहा हजार रुपये बोनस देण्यात यावे, अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे लाभ मिळण्याबाबत चे सर्व अर्ज ऑनलाईन प्रक्रिया बंद असल्यास त्वरित सुरू करण्यात येतील, बोनस देण्याबाबत निर्णय घेऊ, असे अश्वासन दिले. बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्यावतीने आज पालकमंत्री खाडे यांच्याकडे त्यांचा कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे नेते शंकर पुजारी, विशाल बडवे, सुमन पुजारी, रंजित लोंढे आदी उपस्थित होते.
यावेळी शंकर पुजारी यांनी सांगितले की, सध्या कामगारांना 32 योजनांचे लाभ मिळण्याबाबत ऑनलाईन प्रक्रिया बंद आहे. बांधकाम कामगारांना 2021 सालामध्ये त्यावेळीचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना 5 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घोषित केलेला होता. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. शासनाने बांधकाम कामगारांना बोनस देण्याबाबत सकारात्मक निर्णय करावा. यावेळी सुरेश खाडे यांनी याबाबतचा अहवाल घेऊन कामगारांना बोनस देण्याबाबत सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन दिले.