

जत : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रान सतत तापवत ठेवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी इच्छुकांची संख्या जास्त असणार आहे. सर्वांना एकत्रित घेऊन नाराज न करता मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविण्याचे आव्हान आमदार पडळकर यांच्यासमोर आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या छावणीत शांतता आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांत मरगळ आली आहे. ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यास काँग्रेस कमी पडत आहे. तसेच संघटनकौशल्याचा अभाव आहे. परिणामी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत, मार्केट समितीचे सभापती सुजय शिंदे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग यांना काँग्रेसची झालेली पडझड पुन्हा सावरावी लागणार आहे.
भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांना शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. मात्र पडळकर यांनी तालुक्यातील विकासाला प्राधान्य देत थेट जनतेशी संपर्क वाढवल्याने त्यांना फायदा होऊ शकतो. भाजप संघटना बळकट करण्याचे काम डॉ. रवींद्र आरळी करीत आहेत. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार राष्ट्रवादी गटाला बळ मिळाले आहे. जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधास प्राधान्य दिले. त्यामुळे एकाकी लढतीच्या भूमिकेतील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांना उभारी मिळाली.
जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांची भूमिका आगामी निवडणुकीत महत्त्वाची आहे. तालुक्यात रिपाइंचे नेते संजय कांबळे, जनसुराज्यचे नूतन तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, प्रहारचे सुनील बागडे, विक्रम ढोणे, किसन टेंगले, बंडू डोंबाळे, सचिन मदने आदींचे राजकीय वजनानुसार महत्त्व राहील. सुरेश शिंदे यांनी थांबा आणि पाहा अशी भूमिका घेतलेली आहे. शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील यांना सोबत घेऊन पक्षाची खिंड लढवणे सुरू आहे.
आमदार पडळकर यांच्या माध्यमातून गतवर्षीपासूनच महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणणे, या दृष्टिकोनातून हालचाली सुरू आहेत. जत शहरासाठी 78 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेची निविदा स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. गत विधानसभा निवडणुकीत प्रथमच शहरातून मताधिक्य दिल्याने भाजपला अधिकचे बळ मिळाले आहे. सध्या नगरपालिकेवर प्रशासक असल्याने इतर पक्षांचेही दुर्लक्ष दिसून येत आहे.