

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सांगलीत भाजपचा मेळावा होणार आहे. दोन माजी नगरसेवक व काही कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सोमवारी रात्रीचे जेवण एका काँग्रेस पदाधिकार्याच्या घरी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांवर भाजपची सत्ता आणण्यासाठी तयारी सुरू आहे. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांचा प्रवेश घडवून भाजपने महापालिकेची महातयारी सुरू केली. त्यानंतर भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते व माजी मंत्री अण्णा डांगे यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घडवून आणत पक्षप्रवेशाचा दुसरा टप्पा पूर्ण केला. आता तिसरा टप्पा सुरू आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते व क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या भाजप प्रवेशाची जुळणी सुरू केली आहे. ते क्रांती कारखाना कार्यस्थळाला भेट देऊनही आले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील आणखी काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत. सोमवारी सांगलीत भाजपचा मेळावा होणार आहे. त्यात काही प्रवेश होतील. भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर रवींद्र चव्हाण हे प्रथमच सांगलीत येत आहेत, या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकार्यांनी त्यांचा सत्कार आयोजित केला आहे. मेळाव्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे रात्रीचे जेवण काँग्रेसच्या एका पदाधिकार्याच्या घरी होणार असल्याची चर्चा जोरात आहे.