

सांगली / मिरज : विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्याच यादीत सांगलीतून आमदार सुधीर गाडगीळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मिरजेतून अपेक्षेप्रमाणे आमदार सुरेश खाडे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. पहिल्याच यादीत या दोन्ही उमेदवारांचा समावेश असल्याने भाजप गोटात आनंद व्यक्त होत आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपण इच्छुक नसल्याचे जाहीर केले होते व त्याबाबतचे एक पत्र त्यांनी पक्षाला दिले होते. त्यानंतर भाजपकडून पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, पृथ्वीराज पवार, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, भाजप नेत्या नीता केळकर यांच्यासह इतरांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालवला होता. त्यातच गेल्या आठवड्यापासून आ. गाडगीळ पुन्हा सक्रिय झाले होते. विकासकामांचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्याने त्यांच्याच उमेदवारीचेही संकेत मिळाले होते.
आमदार गाडगीळ यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे जाहीर केल्यानंतर सांगली मतदारसंघात इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, पक्षाने पुन्हा एकदा गाडगीळ यांच्यावरच विश्वास दाखवला. रविवारी भाजपने राज्यातील 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या पहिल्याच यादीत सांगलीतून सुधीर गाडगीळ, तर मिरजेतून सुरेश खाडे यांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही आ. गाडगीळ कार्यक्रमातच होते. त्यांनी पक्षादेश महत्त्वाचा असल्याचे सांगितले. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शेखर इनामदार, शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, गौतम पवार यांनी गाडगीळ यांची भेट घेऊन अभिनंदन केले. भाजप नेत्या नीता केळकर यांनीही सुधीर गाडगीळ यांचे अभिनंदन केले आहे. त्या म्हणाल्या की, पक्षाने दिलेल्या आदेशानुसार काम करणार असून, तिसर्यांदा आमदार होऊन ते नव्या सरकारमध्ये मंत्रीही होतील.
भाजपचे शहर जिल्हा सचिव बाबासाहेब आळतेकर म्हणाले, कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी पहिल्यांदा सांगली जिल्ह्यात कमळ फुलवले होते. त्यानंतर सातत्याने ते चारहीवेळा निवडून आले. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पाचव्यांदा त्यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर केली आहे. ते पाचव्यांदा पुन्हा आमदार होतील हे निश्चित.
मिरजेतील माजी नगरसेवक गणेश माळी म्हणाले, पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांची उमेदवारी ही पहिल्या यादीतच जाहीर होईल, ही अपेक्षा होतीच. कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या अपेक्षेप्रमाणेच पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाले. ते पाचव्यांदा पुन्हा आमदार होतील. भाजपचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे म्हणाले, कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी मिरज शहर व मिरज ग्रामीण भागातील सर्व समाजातील सर्व घटकांसाठी निधी देऊन काम केले आहे. त्यांचा एकूणच सर्व अहवाल हा सकारात्मकच होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे खाडे यांना पक्षाने पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे यापुढेही ते निवडून येऊन सांगली जिल्ह्यात पाचव्यांदा कमळ फुलवतील याचा विश्वास आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य हंबर म्हणाले, ना. सुरेश खाडे यांनी कामगारमंत्री म्हणून तसेच पाच वर्षांत केलेल्या कामांची पोहोचपावती म्हणून पक्षाने पहिल्या यादीत त्यांची उमेदवारी जाहीर केली.
पालकमंत्री सुरेश खाडे यांना सलग पाचव्यांदा पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर केल्याने मिरजेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. मिरजेतील मार्केट येथे असणार्या कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. यावेळी भारतीय जनता पार्टी व सुरेश खाडे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. सुरेश खाडे यांना उमेदवारी मिळाल्याने तेच आताही निवडून येतील, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
आ. सुधीर गाडगीळ यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिसर्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल मला अत्यंत अभिमान आणि कृतज्ञता वाटते. आधी मी राजकीय निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता, पण पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी स्वतः व्यक्ती येत असल्या कारणामुळे तसेच पक्षादेश अंतिम असतो, म्हणूनच तो मान्य करून उमेदवारी स्वीकारत आहे व माझा निर्णय मागे घेतो. सांगलीच्या जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास पाहून मी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पक्षाकडून मिळालेली ही संधी मला विशेष प्रेरणा देणारी आहे. या निर्णयामुळे माझ्या सेवेला नव्याने बळ मिळाले आहे आणि सांगलीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकत्रित अधिक सक्षम पावले उचलू. पक्षाच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या हितासाठी कार्यरत राहण्याचे वचन मी पुन्हा देतो. तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा हीच माझी प्रेरणा आहे.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे म्हणाले, पक्षाने माझ्यावर सलग पाचव्यांदा विश्वास दाखविला. नेत्यांनी व मिरजेतील जनतेने विश्वास दाखविल्यामुळेच मला पहिल्या यादीमध्ये पाचव्यांदा उमेदवारी जाहीर झाली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. गेल्या पंधरा वर्षांमध्ये मिरजेमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली, त्याची ही पोहोचपावती आहे. जी काही कामे राहिली आहेत, ती पुढील पाच वर्षात निश्चितपणे पूर्ण करू. भविष्यातही मिरज शहर व मिरज ग्रामीणची जनता मला मोठ्या ताकदीने साथ देईल, असा मला विश्वास आहे, असे मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.