Dilip Suryawanshi : भाजपचे नेते दिलीप सूर्यवंशी यांचे निधन

हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार; राजकीय, सामाजिक क्षेत्रातून श्रद्धांजली
Dilip Suryawanshi
भाजपचे नेते दिलीप सूर्यवंशी यांचे निधन
Published on: 
Updated on: 

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप रामकृष्ण सूर्यवंशी (वय ६७) यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यांच्यावर येथील उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. महापौर धीरज सूर्यवंशी व नगरसेवक चेतन सूर्यवंशी यांचे ते चुलते होत.

पैलवान म्हणून परिचित असलेले दिलीप सूर्यवंशी हे माजी मंत्री मदन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी १९८८ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९९१ मध्ये काँग्रेस पक्षाकडून ते तत्कालीन सांगली नगरपालिकेत प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९६ मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर २००३ च्या निवडणुकीतही ते पुन्हा नगरसेवक झाले. दि. ११ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००१ या कालावधीत स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी २००३ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीचे सदस्य म्हणून कार्यरत होते.

शनिवारी सायंकाळी अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, उपमहापौर गजानन मगदूम, शेखर इनामदार, अतुल माने यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते, नगरसेवक, नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ९ वाजता होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.