Sangli News : भाजपमध्ये गर्दी वाढली, गोंधळही वाढला

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
BJP Party
भाजपमध्ये गर्दी वाढली, गोंधळही वाढलाFile Photo
Published on
Updated on

उध्दव पाटील

सांगली : सांगलीत भाजपमध्ये तीन-चार गट आहेत. त्यात पुन्हा काँग्रेसमधील चार गटापैकी दोन गट दाखल झाले आहेत. भाजपमध्ये गर्दी वाढली आहे. मात्र गर्दीपेक्षाही गोंधळ अधिक वाढल्याचे दिसत आहे. भाजपमध्ये इनकमिंग वाढवून पक्षाचा विस्तार आणि महापालिकेवर झेंडा फडकवण्याचा प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आहे. मात्र त्यातून गटा-तटाचे राजकारणच अधिक तीव्र होत आहे. महत्त्वाकांक्षांचा स्फोट होत आहे. गटा-तटाच्या संघर्षातून भाजपमधील एकजिनसीपणा हरवल्याचेच प्रकर्षाने दिसत आहे.

आमदार सुधीर गाडगीळ हे स्वभावत: शांत, मितभाषी, संयमी नेते म्हणून ओळखले जातात. कोणावरही टीका न करणारे व्यक्तिमत्त्व. मात्र सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरू असलेल्या घडामोडींनी त्यांचा पारा एकदम जोरात वाढल्याचे दिसून आले. त्यामुळेच त्यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकातील मजकूर पाहून त्यावर स्वत: सुधीर गाडगीळ यांचीच स्वाक्षरी आहे का, याची खात्रीही काहींनी त्यांना फोन करून घेतली. त्यांनी माध्यमांना दिलेले प्रसिद्धीपत्रक म्हणजे राजकीय लेटरबॉम्बच आहे. भाजप हा पक्ष आता ‘पार्टी विथ डिफरन्स’ राहिलेला नाही. मात्र ‘पार्टी विथ डिव्हिजन’कडे वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

22 तिकिटांवरून सवाल

महापालिका निवडणुकीसाठी एकूण 78 जागा आहेत. 2018 च्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर 41 उमेदवार निवडून आले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अनुक्रमे 20 व 15 असे एकूण 35 उमेदवार निवडून आले होते. दोन अपक्ष होते. काँग्रेसच्या 20 नगरसेवकांमध्ये मदनभाऊ गटाची संख्या 13 होती. त्यापैकी 6 नगरसेवकांनी जयश्री पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 78 जागांपैकी भाजपच्या 41 जागा वगळता उर्वरित 37 जागांमध्ये मदनभाऊ गटाने 26 जागांवर हक्क सांगितला असून, 22 जागा तरी मिळतील, असा विश्वास आणि तशी चर्चा या गटात आहे. त्यातूनच आमदार गाडगीळ यांनी 22 तिकिटांवरून सवाल उपस्थित केला आहे. महापालिका क्षेत्रात केवळ 6 नगरसेवकांनीच प्रवेश केला असताना, 22 तिकिटे कोणाला देणार, असा थेट प्रश्न आमदार गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेची दोरी कोणाच्या हाती..!

सांगली विधानसभा मतदारसंघातून सुधीर गाडगीळ हे तीनदा विजयी झाले आहेत. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी अर्थात जेजेपीची मदत लाभली. निवडून आल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला. त्याचा लाभ महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत झाला. सांगलीतून भाजपला मोठे बळ मिळाले. विधानसभेची 2019 ची आणि 2024 ची निवडणूक गाडगीळ यांनी जिंकली. 2024 च्या निवडणुकीत उमेदवारीवरून धुसफूस झाली. शेखर इनामदार प्रबळ इच्छुक होते. त्यातून गटबाजी चव्हाट्यावर आली. विधानसभा निवडणुकीतील हॅट्ट्रिकने आमदार गाडगीळ यांचा आत्मविश्वास दुणावला.

महापालिकेच्या आजपर्यंतच्या निवडणुकीत भाजपकडून राजकीय चाणक्य अशी ओळख असलेले शेखर इनामदार हेच सर्व सूत्रे हलवत होते. पण यावेळी आमदार गाडगीळ हेही सूत्रे आपल्याकडेच राहावीत, याबाबत कमालीचे दक्ष असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्या विजयासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रसंगी कणखर भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जयश्री पाटील, समित कदम, शेखर इनामदार हे तीन नेते एकत्र येऊन उमेदवारी वाटपात जादा वाटा उचलू शकतात, अशी भीती गाडगीळ समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे हल्ला म्हणजेच बचाव, हा पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

गटा-तटाच्या गाठी...पालकमंत्र्यांची कसोटी

महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी भाजपला सांगली आणि कुपवाड ही दोन्ही शहरे महत्त्वाची आहेत. त्यामुळे आमदार सुधीर गाडगीळ, जयश्री पाटील, शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, पृथ्वीराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप नेत्या नीता केळकर या सर्वांना बरोबर घेऊन जाणे आणि ज्याच्या-त्याच्या ताकदीनुसार जागावाटप होणे गरजेचे आहे. त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची खरी राजकीय कसोटी लागणार आहे. पक्षांतर्गत गट-तटाचा बंदोबस्त योग्यप्रकारे न केल्यास बंडखोरीचे पीक जोमात येईल आणि भाजपला त्याचा फटका बसू शकेल. गटा-तटाच्या गाठी कशा सोडवल्या जातात, की त्या घट्ट बसतात, यावरच महापालिका निवडणुकीत भाजपची कामगिरी दिसून येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news