

वारणावती : परिस्थितीची जाणीव, शिकण्याची इच्छा, काही तरी करून दाखवण्याची उमेद, आई-वडिलांची मेहनत, शाळेचा मदतीचा हात, शिक्षकांचं मार्गदर्शन यामुळे बिरजू घडत गेला, प्रगतीचं शिखर चढत गेला आणि आयएएस होऊन सहायक जिल्हाधिकारीपदी नुकताच रुजू झाला.
ही प्रेरणादायी कहाणी आहे पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थानमधून शिराळ्यात आलेल्या आणि आश्रमशाळेत शिकून आपल्या गुणवत्तेचा ठसा समाजात उमटवलेल्या बिरजू गोपाल चौधरी या अवघ्या चोवीस वर्षांच्या युवकाची. शिराळा येथील सद्गुरू आश्रमशाळेचा बिरजू गोपाल चौधरी हा माजी विद्यार्थी आहे. सन 2023 - 24 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात 187 व्या रँकने बिरजू उत्तीर्ण झाला होता. राजस्थान सरकारने 13 आय.ए.एस. अधिकार्यांच्या नुकत्याच नियुक्त्या केल्या आहेत. यात पाली जिल्ह्याच्या सहायक जिल्हाधिकारीपदी बिरजू चौधरी यांची वर्णी लागली आहे.
वीस वर्षांपूर्वी बिरजू आणि त्याचे कुटुंब राजस्थानमधील कोटा येथून सांगलीच्या शिराळ्यात आले होते. दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून त्यांनी संसार केला. पहिली ते दहावी बिरजू येथील सद्गुरु आश्रमशाळेत शिकला. राजस्थानातून आल्यामुळे सुरुवातीला त्याला मराठी बोलता येत नव्हते. मात्र त्याने मराठीवर प्रभुत्व मिळवले. दहावी तो 93 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला.
संस्थापक सचिव एकनाथराव जाधव म्हणाले, आमच्या सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेच्या शिराळा शाखेत बिरजूचं शिक्षण झालं, याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रशांत नलवडे (आय.ए.एस), रोहन जाधव (लेफ्टनंट), डॉ. गीतांजली जाधव (एम.बी.बी.एस. दुबई), कबड्डी खेळात महाराष्ट्राचं नेतृत्व केलेली सोनाली हेळवी असे विद्यार्थी शाखांमधून घडत आहेत.