

पलूस : पलूस-आंधळी रस्त्यावर असलेल्या इंगळे पाझर तलावाचा परिसर सध्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेला दिसत आहे. तलावातील पाणी घटत असतानाच करकोचे, बगळे आणि हळदकुंकू बदकांचा, साधारण दीडशेहून अधिक पक्ष्यांचा थवा येथे जमला असून संपूर्ण तलाव परिसर ‘पक्षी महोत्सवा’ने गजबजून गेला आहे. निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि पर्यटनप्रेमींसाठी हे दृश्य अविस्मरणीय ठरत आहे.
तलावातील पाणी उथळ होत असल्याने पक्ष्यांना खाद्य शोधणे अधिक सोयीचे झाले आहे. त्यामुळे करकोचे आणि बगळे तलावाकडेला मोठ्या थव्याने उतरून मासेमारी करताना दिसत आहेत. त्यांच्या हालचालीतून पाण्यावर उमटणाऱ्या तरंगांची नाजूक लय, निसर्गातील एक वेगळा आनंद देत आहेत. हळदकुंकू बदके पाण्यातून एवढ्या वेगाने ते धाव घेत असल्याने त्यांच्या हालचालींमधून ‘रेल्वेचा आवाज’ निर्माण होत असल्याचा रोमांचक अनुभव येत आहे.
करकोचे पक्ष्यांनी मात्र संपूर्ण तलावाला जणू आपले खेळांगणच बनविले आहे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेणे, तलावाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे हवेत मुक्त विहार, कधी सायंकाळच्या सौम्य वाऱ्याला साथ देत आकाशात सुंदर वलये निर्माण करणेही सर्व दृश्ये तलाव परिसराला मंत्रमुग्ध करून टाकत आहेत. तलावाभोवती पक्ष्यांचा सततचा किलबिलाट, पंखांच्या आवाजाने वातावरणात नैसर्गिक संगीतच दुमदुमत आहे.