

तासगाव : बिरणवाडी (ता. तासगाव) येथील खोरीच्या मळा येथे ट्रॅक्टरचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या सुभद्रा ज्ञानदेव मोरे (वय 70, रा. बिरणवाडी) यांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी घडला. याप्रकरणी सुरेश ज्ञानदेव मोरे (रा. बिरणवाडी) यांनी फिर्याद दिली. पांडुरंग धोंडिराम मोरे (वय 32, रा. बिरणवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित पांडुरंग मोरे हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र. एमएच 10 डीएल 2260) रवींद्र मोरे यांच्या उकिरड्याजवळील कच्च्या रस्त्यावर मागे पुढे करीत असताना, सुभद्रा मोरे यांना ट्रॅक्टरचा धक्का बसला. त्या धक्क्याने सुभद्रा या पाठीमागे कच्च्या रस्त्यावर पडल्या. डोक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सुरू आहे.