Ingle Kidnapping Case: प्रा. मोहन वनखंडे, अजित शेजूळ फरारच

संशयित चौघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

सांगली : मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगाव गणाचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण केल्याप्रकरणी शिंदे शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख प्रा. मोहन वनखंडे, अजित शेजूळ यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी याअगोदर अटक केलेले संशयित समीर अकबर होनवाडे (वय 27, रा. नरवाड, ता. मिरज), अजित मुर्ग्याप्पा कट्टीकर (वय 27), आनंद ऊर्फ गोटू बाबू गावडे (वय 27), प्रशांत बाबासाहेब क्षीरसागर (वय 20, तिघे रा. मालगाव, ता. मिरज) यांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसाची वाढ करण्यात आली आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडीपूर्वी बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिसांत दिली होती. याप्रकरणी समीर होनवाडे (रा. नरवाड), अजय कट्टीकर, गोटू गावडे, क्षीरसागर (सर्व रा. मालगाव) यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवला होता. सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तपास करून संशयित समीर होनवाडे, अजित कट्टीकर, आनंद ऊर्फ गोटू गावडे, प्रशांत क्षीरसागर या चौघांना अटक केली. अटकेतील चौघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी शिंदे शिवसेनेचे प्रा. मोहन वनखंडे, पंचायत समिती उपसभापतींचा मुलगा अजित शेजूळ यांच्या सांगण्यावरून इंगळे यांचे अपहरण केल्याचे सांगितले. चौघांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. त्यानुसार पोलिसांनी प्रा. मोहन वनखंडे व अजित शेजूळ यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र दोघांचाही मोबाईल बंद असून ते गायब आहेत. ते फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिरज पंचायत समितीमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही. भाजपचे सर्वाधिक सदस्य असूनही सभापती निवडीत त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला. या अपहरण प्रकरणात शिवसेना महानगर प्रमुख प्रा. मोहन वनखंडे यांच्याशिवाय आणखी कोणत्या वरिष्ठ नेत्याचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. इंगळे यांनी जबाबात चौघा संशयितांनी पिस्तूलचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन अपहरण केल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी या चौघाकडे तपास सुरू ठेवला आहे. खरोखर पिस्तूलने धाक दाखवला आहे का? संशयितांकडे पिस्तूलचा परवाना आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. यासाठी या चौघांची पोलिस कोठडी आणखी दोन दिवस वाढवून घेण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news