

मिरज : भोसे (ता. मिरज) येथे नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर टँकरला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. दिनेश बाळासाहेब माने (रा. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. अपघातात गणेश विलास दाईंगडे (वय 27, रा. मोहोळ, जि. सोलापूर) हा जखमी झाला. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गणेश दाईंगडे व दिनेश माने हे दोघे दि. 14 रोजी सोलापूर येथून कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे देवदर्शनास निघाले होते. दुपारी भोसे येथे रस्त्यावर थांबलेल्या टँकरला पाठीमागून धडकल्याने दिनेश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, महामार्गावर कोणतेही रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक न लावता महामार्गाच्या उजव्या बाजूला (टीएस 07 यूए 2406) हा टँकर झाडांना पाणी घालण्यासाठी थांबला होता. महामार्गावर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु ते केले नसल्याने दिनेश माने यांना टँकरचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी टँकरवर आदळल्याने हा अपघात झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.