

सांगली : भुईंज (जि. सातारा) येथे सराफ व त्याच्या साथीदाराला मारहाण करून 20 लाखांची रोकड लंपास करण्यात आली. या घटनेनंतर तीन तासात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दरोड्यातील संशयिताच्या योगेवाडी (ता. तासगाव) येथे मुसक्या आवळल्या. विनित राधाकृष्णन् (वय 30, रा. पल्लकड, राज्य केरळ) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दरोड्यातील मोटारही जप्त केली आहे.
याबाबत माहिती अशी की, हिरवे (ता. खानापूर) येथील विशाल पोपट हासबे हा सराफ व्यावसायिक व त्याच्या साथीदाराला शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास भुईंज येथे मारहाण करून 8 ते 10 जणांनी लुटले. दरोड्यानंतर संशयितांनी मोटारीतून सांगलीच्या दिशेने पळ काढला होता. याबाबत सातारा पोलिस नियंत्रण कक्षाकडून सांगली नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांना तातडीने संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी विशेष पथक तत्काळ रवाना केले.
दरम्यान, सातारा पोलिस व फिर्यादी हसबे यांचे मित्रही दरोडेखोरांच्या मागावर होते. एलसीबीच्या पथकातील सागर टिंगरे व उदय साळुंखे यांना, दरोडेखोरांच्या मोटारीचा योगेवाडीजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली. संशयित मोटार जागेवर सोडून दरोडेखोर डोंगरवाटेने पळून गेले होते. एलसीबीच्या पथकाने योगेवाडीकडे धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने डोंगर परिसर पिंजून काढला. यावेळी संशयित विनित राधाकृष्णन् हा डोंगरात लपून बसला होता. तो पोलिस पथकाच्या हाती लागला. पथकाने त्याच्याकडे चौकशी केली असता, इतर साथीदार डोंगरात पळून गेल्याचे सांगितले. एलसीबीने संशयित राधाकृष्णन् याच्यासह दरोड्यातील मोटार भुईंज पोलिसांच्या हवाली केली. अवघ्या तीन तासात सांगली पोलिसांनी भुईंज दरोड्यातील संशयितांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, उदय साळुंखे, सागर टिंगरे, सुशील मस्के, दरिबा बंडगर, सतीश माने, सुनील जाधव यांनी भाग घेतला.
भुईंज दरोड्यातील टोळी केरळ राज्यातील पल्लकडमधील असल्याचे तपासात समोर आले. सांगली पोलिसांनी पल्लकड पोलिसांशी संपर्क साधला आहे. दरम्यान, अटक केलेला संशयित राधाकृष्णन् हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महामार्गावर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. दरोडेखोर्यांच्या टोळीकडून महामार्गावर दरोडे टाकले जात असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.