

कडेगाव : दिल्ली येथे सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21 फेब्रुवारीपासून लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले. संमेलनात साहित्य रसिकांची भोजनव्यवस्था भारती विद्यापीठ संकुलातर्फे केली आहे.
या भोजन कक्षात तीन दिवस देशभरातून आलेल्या साहित्य रसिकांना सुग्रास भोजनाची मेजवानी मिळणार आहे. भारती विद्यापीठाने दिल्लीत होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मदत करावी, अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत भारती विद्यापीठाचे कार्यवाह, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी भोजन व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारली. देशभरातून आलेले पाच हजार साहित्यरसिक दररोज येथे भोजनाचा आस्वाद घेत आहेत. त्यासाठी संकुलाचे प्राध्यापक व सेवक परिश्रम घेत आहेत. तसेच संमेलनात भारती विद्यापीठाची भव्य स्वागत कमान लक्ष वेधत आहे.
आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सांगली येथे डॉ. म. द. हातकणंगलेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठीही भारती विद्यापीठाने पुढाकार घेतला होता. भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. पतंगराव कदम सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. दिल्लीत होणार्या साहित्य संमेलनात विविध खाद्य पदार्थांची मेजवानी मिळणार आहे.
आज, शनिवार, 22 रोजी दुपारी 12 वाजता मुख्य मंडपात ‘मराठीचा अमराठी संसार’ या विषयावर मनमोकळा संवाद होणार आहे. अनेक मान्यवरांसह ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे आपल्या पत्नीसह या परिसंवादात सहभागी होणार आहेत. आमदार डॉ. विश्वजित कदम या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. त्यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार होणार आहे.