Bendur Festival : शर्यतीच्या बैलाची किंमत ३० लाखाच्या घरात!

नादखुळा राऊंडाचा : रोजचाच खुराक हजाराचा : बाजार तेजीचा
Bendur Festival
शर्यतीच्या बैलाची किंमत ३० लाखाच्या घरात!
Published on
Updated on

विवेक दाभोळे

सांगली : सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडी राऊंडांवरील (शर्यत) बंदी उठवल्यानंतर खास राऊंडांसाठी बैलांना पाळणारे शौकिन खूश तर आहेतच, शिवाय गावगाड्यात लाखा-लाखांचं राऊंड धूमधडाक्यात सुरू आहेत. त्यामुळं पळावू बैलजोडीची मागणी वाढलीय. खास राऊंडाच्या एकेका बैलाची किंमत पाच-पाच लाखाच्या घरात असायची, आता ती पंधरा-पंधरा, वीस-वीस, अगदी पंचवीस ते तीस-तीस लाखाच्या घरात गेलीय. तरीसुद्धा असा बैल सहसा विकलाच जात नाही हे विशेष..! नाद, ईर्षा आणि वेगाचं गारूड वेडं करतं.

शेतकरी दावणीच्या बैलजोडीची काळजी घेतो जिवापाड, पोटच्या लेकरासारखी राव. मशागतीसकट खास शर्यतीसाठी पळावू बैलजोडी सांभाळणारं शेतकरी लई आहेत. राज्य सरकारनं २०१४ मध्ये बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. त्यामुळं शौकिनांमध्ये तीव्र नाराजी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं १६ डिसेंबर २०२१ ला बंदी उठवली. त्यानंतर राऊंडाला जत्रा उसळू लागली. झाले, अस्सल खिलार बैलांचं भाव वधारलं. शेतशिवारात राबणाऱ्या बळीराजाला न्याय मिळाला. शेतीकामासाठी आणि राऊंडासाठी काटक आणि चपळ खिलार बैलांना मागणी वाढली. यामुळे गोवंश संवर्धनास गती मिळाली, खेरीज यात्रा, जत्रांमधील ग्रामीण साज परंपरा बहरू लागली. ग्रामीण अर्थकारणास मदत होऊ लागली.

आदत खोंडाची किंमत ७० हजारापासून ते दोन लाखापर्यंत राहते. यात वय, जात आणि त्याचा ‘स्टॅमिना’ पाहून किंमत निश्चित होते. ब गटातील बैलांची किंमत किमान १० ते १५ लाखांच्या घरात आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या अ गटातील बैलाची किंमत सुरू होते तीच सात लाखापासून! सात-साडेसात लाखापासून ते पंधरा-पंधरा लाखाच्या घरात एकेका बैलाची किंमत राहिली आहे. आता तर तीस लाखाच्या घरात या किंमती गेल्या आहेत. विशेष म्हणजे इतकी किंमत मोजून बैल जोपासण्याचा नाद करणारी अनेक घराणीच्या घराणी आहेत. या नामांकित घराण्यांनी तन-मन- धनानं हा राऊंडाचा नादखुळा नाद जाेपासला आहे.

झाला जणू एक उद्योगच...

आदत हा खिलार खोंडांचा अ गट, दुस्सा-चौस्सा यांचा ब गट आणि अ गटातील बैल अनेक वेळा दुस्सा, चौस्सा आणि काही वेळेस तर सहादातीही असतात. अ गटातील बैलांना मोठी मागणी राहते. खिलार जातीच्या आदत बच्च्याला निगा राखून तयार करणाऱ्या शेतकरी, पशुपालकास त्याच्या विक्रीतून किमान अडीच ते तीन लाख रुपये मिळतात. आदत खोंडांची निगरानी आणि विक्री यातून लाखोंचा एक जणू उद्योगच सुरू आहे.

राऊंडांचे प्रमुख तीन गट...

आदत - कोवळा खोंड (दात यायचे असतात, वय दोन वर्षापर्यंत)

दुस्सा - दोन दातांचा (वय अडीच ते तीन वर्षे)

चौस्सा - चार दात (वय साडेतीन ते साडेचार वर्षे)

गट आणि बक्षिसांची दौलतजादा अशी...

आदत - तुलनेने कमी (कमित-कमी अडीच लाख)

ब- मध्यम रक्कम (कमित कमी एक लाख)

अ - लाखो रुपयांची बक्षिसे (कमित कमी दोन लाख)

नंबर येवो न येवो, असा असतो खर्च...

सकाळी- संध्याकाळी अडीच-तीन किलोचा भरडा

भरड्यात असते मटकी, हरभरा, सातू

रोजचा खर्च किमान हजार रुपये

प्रत्येक बैलास शेळीचे रोज किमान पाच लिटर दूध

शेळीचे दूध -८० रुपये लिटर

दूध जमा करण्यासाठी मजुरास दिवसाला दोनशे रुपये हजेरी

महिन्याला किमान अडीच-तीन हजारांचे टाॅनिक

पशुवैद्यक बोलवला, त्यानं बैलास हात लावला की, किमान अडीच हजार मोजा...

बैलांना पळवणाऱ्यास एका राऊंडास - दीड हजार रुपये

बैलजोडी टेम्पोतून नेण्याचे भाडे वेगळेच!

शिवाय, दररोज कडबा, कोरडा चारा याचा खर्च..!

बैलगाडी राऊंडांचा धुरळा सर्वत्र उडू लागला आहे. अनेक ठिकाणी लाखा-लाखाच्‍या बक्षिसाचे राऊंड होत आहेत. यातून राऊंडासाठीच्या बैलांना मागणी वाढू लागली आहे. शर्यतशौकीन पोटच्या पोरासारखे या बैलांना जोपासतात. आदतची निपज, निगरानी करणारं शेतकरी यांना चार पैसे मिळू लागतील. तसेच यातून खिलार, गोवंश संवर्धनासही बळ मिळेल.
- फारुक जमादार, कसबे डिग्रज (शर्यतीतील जमादार घराणे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news