Shirala Nagpanchami : ४१ ठिकाणी जिवंत नागांचे प्रदर्शन

शिराळ्यात ६१७ पोलिस, ड्रोन अन् व्हिडीओ कॅमेऱ्यांच्या नजरेत नागपंचमी सोहळा उत्साहात
Shirala Nagpanchami
४१ ठिकाणी जिवंत नागांचे प्रदर्शन
Published on
Updated on

शिराळा : केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या विशेष परवानगीमुळे यंदा शिराळ्यात तब्बल ४१ ठिकाणी वन विभागाच्या देखरेखीखाली जिवंत नागांचे प्रदर्शन भरवून सर्पविषयक समाजप्रबोधन करण्यात आले. सन २००२ नंतर नागपंचमी उत्‍सवात जिवंत नाग पाहता आले नव्हते. मात्र गेल्यावर्षी २१ आणि यंदा ४१ ठिकाणी ही सोय उपलब्ध झाल्याने, राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घेता आले. हे प्रदर्शन यंदाच्या नागपंचमी उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले.

यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच न्यायालयाच्या आदेशांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी पोलिस, वन विभाग, महसूल आणि आरोग्य प्रशासनाने अत्यंत जय्यत नियोजन केले होते. सुरक्षेसाठी ६१७ पोलिस जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यासाठी अंबामाता मंदिर परिसर, मिरवणूक मार्ग व प्रमुख चौकांमध्ये २० सीसीटीव्ही कॅमेरे, १५ फिरते व्हिडीओ कॅमेरे, १२ ध्वनिमापक यंत्रे, ४ वॉच टॉवर आणि २ दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली होती. संशयित हालचालींवर ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने करडी नजर ठेवली जात होती.

आमदार सत्यजित देशमुख व भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या विशेष प्रयत्नांमुळे यंदा ४१ जिवंत नाग पकडून समाजप्रबोधन करण्याच्या उपक्रमास मंजुरी मिळाली. बेकायदा सर्प हाताळणी रोखण्यासाठी वन विभागाचे १५० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर ७ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले होते, तर शहरांतर्गत ३२ गल्ल्यांमध्ये १० विशेष गस्ती पथके फिरत होती.

आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य विभागाने ७ वैद्यकीय पथके सज्ज ठेवून सर्पदंशावरील ६०० प्रतिबंधक लसी उपलब्ध केल्या होत्या. उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर यंत्रणा, ३ रुग्णवाहिका तैनात होत्या. शिराळा आगाराच्या ३५ व बाहेरील ३० अशा एकूण ६५ जादा बसेसची सोय करण्यात आली होती. नगरपंचायतीने २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून, स्वच्छता आणि औषध फवारणी केली, तर महावितरणने अखंडित वीजपुरवठा ठेवला.

विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील, तहसीलदार शामला खोत-पाटील, नायब तहसीलदार अस्लम जमादार, पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे, सभापती राजसिंह पाटील व वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांनी प्रत्यक्ष फिरून बंदोबस्त व सोयींची पाहणी केली. तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित देशमुख, विराज नाईक, ॲड. भगतसिंग नाईक, रणधीर नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी मान्यवरांनी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news