

सांगली : बंदी असलेल्या सिंगल युज प्लास्टिकचा साठा, वापर याप्रकरणी 13 व्यावसायिकांना 26 हजार रुपये दंड तसेच रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल एका व्यावसायिकास 7 हजार रुपये दंड, असा एकूण 33 हजार रुपये दंड करण्यात आला. दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. महापालिकेच्या पथकाने ही कारवाई केली.
सिंगल युज प्लास्टिकचा साठा, वापर याविरोधात कारवाईची मोहीम राबवण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहेत. त्यानुसार मुख्य स्वच्छता अधिकारी तथा सहायक आयुक्त सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी, अतुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील काही व्यापारी भागात सिंगल युज प्लास्टिकच्या अनुषंगाने दुकानांची तपासणी मोहीम राबवली.
या तपासणीदरम्यान सिंगल युज प्लास्टिकचा साठा व वापर आढळून आलेल्या 13 व्यावसायिकांना प्रत्येकी 2 हजार रुपये, याप्रमाणे 26 हजार रुपये दंड आकारण्यात आला. दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याबद्दल एका व्यावसायिकाला 7 हजार रुपये दंड करण्यात आला. तपासणी मोहिमेत स्वच्छता निरीक्षक अक्षय कोलप, नितीन कांबळे, सचिन वाघमोडे, पंकज घनके आणि महेश कांबळे यांनी सहभाग घेतला. सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले.