

मांजर्डे : बलगवडे (ता. तासगाव) येथे प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी ग्रामस्थांचा विरोध झुगारून अखेर वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. दोनवेळा ग्रामस्थांनी एकत्र येऊन विरोध केल्यामुळे वृक्षतोड थांबविण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारपासून पोलिस संरक्षणात वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली.
पर्यावरण संरक्षणासाठी एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशी घोषणा करते आणि दुसऱ्या बाजूला ‘झाडे तोडा, सोलर लावा’, अशी भूमिका घेत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
बलगवडे येथे सौरऊर्जा प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. यामुळे शुक्रवारी कंपनीने पोलिस संरक्षणामध्ये गट नंबर 180 आणि 181 मधील 8.41 हेक्टर जमिनीवर काम सुरू केले. दोनवेळा ग्रामस्थांच्या विरोधामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माघारी जावे लागले होते. यामुळे संबंधित कंपनीने शनिवारी पोलिस संरक्षण घेऊन झाडे तोडायला सुरुवात केली. यामुळे जवळपास 10 ते 15 हजार झाडे नष्ट होऊन पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. शिवाय ग्रामपंचायतीने वृक्षारोपणासाठी केलेला 10 लाखांचा खर्चही वाया जाणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शुक्रवारी दिवसभर पोलिस संरक्षणात वृक्षतोड करण्यात आली. शनिवारी मात्र पुन्हा ग्रामस्थ व महिलांनी एकत्र येऊन त्यास विरोध केला. ग्रामस्थांचा विरोध झुगारून पोलिस संरक्षणात काम सुरूच ठेवण्यात आले. माजी सरपंच प्रवीरा बुधावले म्हणाल्या, गावातील गोरगरिबांनी जायचे कोठे? जनावरांना चारण्यासाठी गायरान वापरले जाते. अनेकांचा प्रपंच जनावरांवर आहे. झाडे नसतील, तर सौरप्रकल्प काय कामाचा? शासनाने ग्रामस्थांचा विचार करून प्रकल्प रद्द करावा.
तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष निवास पाटील म्हणाले, या प्रकल्पाची आमच्या गावाला गरज नाही. 500 झाडे असल्याचा खोटा पंचनामा केला आहे. जवळपास 15 हजार झाडे येथे आहेत. झाडे आम्ही लावून ती जगवली आहेत. गावाच्या महिलांनी कष्ट करून त्यांना पाणी घातले आहे. हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलन उभे करावे लागले तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. श्रीकांत मोहिते म्हणाले, या प्रकल्पासाठी चुकीचे पंचनामे केले आहेत. तसेच गायरानातून गेलेला रस्ता सुद्धा गायब केला आहे. यामध्ये प्रशासनही सहभागी आहे. याची चौकशी करून प्रकल्प रद्द करावा.
योजना पाटील म्हणाल्या, हा प्रकल्प म्हणजे शासनाच्या ‘झाडे लावा झाडे जगवा’ या धोरणाच्या व पर्यावरणाच्या विरोधात आहे. महिलांनी तांब्याने पाणी घालून झाडे वाढवली आहेत. गरज पडली तर आम्ही आत्मदहन करू. यावेळी अनिल पाटील, सरपंच हणमंत शिंदे, सचिन पाटील, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष निवास पाटील, उपसरपंच जमीर मुलाणी, पिंटू तोडकर, रवी शिंदे, अमीर मुलाणी, बजरंग पाटील, चंद्रकांत पाटील, विकास पाटील, ऋषिकेश पाटील, धनाजी शिंदे, सुनील माळी, सुवर्णा पवार, शुभांगी पाटील, सावित्री पाटील, कल्पना पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. यावेळी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.